महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गुरुवारपासून (२९ नोव्हेंबर) दोन दिवसांचे समीक्षकांचे पहिले संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ समीक्षक प्रा. के. रं. शिरवाडकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ८२ लाख रुपये निधीच्या व्याजातून परिषदेने जे विविध उपक्रम हाती घेतले आहेत, त्यातील हा महत्त्वाचा उपक्रम आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उत्सवी वातावरणात समीक्षेसारख्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होत नाही अशी साहित्यिकांची भावना होती. त्या पाश्र्वभूमीवर परिषदेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संमेलनाच्या उद्घाटन सत्रात प्रा. के. रं. शिरवाडकर यांचे ‘साहित्य-समाज आणि संस्कृती’ या विषयावर बीजभाषण होणार आहे. त्यानंतर ‘रूपवादी आणि सौंदर्यवादी समीक्षा : सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात’ या विषयावर साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांचे भाषण होणार आहे.
दुसऱ्या दिवशी (३० नोव्हेंबर) ‘साहित्याची बांधिलकी आणि लेखकाचे स्वातंत्र्य : एक पुनर्विचार’ या विषयावर ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांचे व्याख्यान होणार आहे. ‘संतसाहित्याचे सांस्कृतिक योगदान’ या विषयावर डॉ. रामचंद्र देखणे, ‘मराठी आधुनिक काव्यातील सांस्कृतिक परिवर्तने’ या विषयावर डॉ. नीलिमा गुंडी, ‘मराठी काव्यप्रवासातील महत्त्वाचे टप्पे’ या विषयावर डॉ. किसन पाटील, ‘लोकप्रिय कादंबरी’ या विषयावर डॉ. रेखा साने-इनामदार आणि ‘दलित साहित्य आणि बदलती मानसिकता’ या विषयावर डॉ. मनोहर जाधव आपले विचार व्यक्त करणार आहेत, असे प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.