महिलांवरील वाढते अत्याचार, तरुणींची शाळा- कॉलेमध्ये होणारी छेडछाड या विरोधात सर्वपक्षीय महिला आमदरांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे धरून, बलात्काऱ्यांचे हातपाय तोडण्याची मागणी केली.
मुंबईत पत्नी समजून एका युवतीवर हल्ला करण्यात आला. डोंबिवलीत एका मुलीची छेडछाड करणाऱ्यांना रोखणाऱ्या युवकाची हत्या करण्यात आली. दिल्लीतही अशीच घटना घडली. महिलांवरील अत्याचाराच्या घटना राज्याच्या कानाकोपऱ्यात घडत आहेत. अशा अत्याचाराच्या विरोधात मतभेद विसरून सर्वपक्षीय महिला आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे धरली होती. डॉ. नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे-पालवे, प्रणिती शिंदे आदी सहभागी  झाल्या होत्या.