वाई: परतीच्या मुसळधार पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.  सततच्या पावसाने अगोदरच शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची लागवड करताना मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या. बऱ्याचदा दिवाळीत स्ट्रॉबेरी विक्रीचा शुभारंभ अनेक शेतकरी करतात. परंतु यंदा पावसामुळे लागवड उशिरा झाली, अजूनही काही शेतकरी लागवड करीत आहेत.

 मुसळधार पावसाने या स्ट्रॉबेरी शेतात पाणी साचल्याने रोपांना धोका निर्माण झाला आहे. भिलार, गुरेघर, भोसे, खिंगर, राजपुरी , आंब्रळ, मेटगुताड, पांगारी ,वाई परिसरात स्ट्रॉबेरी शेतीत पाणी साचलेने शेतकरी आर्थिक संकटात हंगामापूर्वीच सापडले आहेत. खिंगर, गोडवली गावातील पिकांच्या नुकसानीची जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राजेंद्र राजपुरे यांनी केली आहे.