माजी मंत्री दत्ताजीराव खानविलकर यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत ओसवाल यांच्याकडे पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे स्मारक बांधू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. वेळ पडली तर या प्रश्नासाठी सर्वोच्च न्यायालयातही जाण्याचा तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. ते अलिबाग इथे पत्रकारांशी बोलत होते.
राज्य सरकारने नानासाहेब धर्माधिकारी यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र स्थानिकांचा या स्मारकाला विरोध आहे.
या स्मारकामुळे नैसर्गिक नाले नष्ट होणार असून स्थानिकांच्या वहिवाटदेखील नष्ट होणार असल्याचे स्थानिकांना वाटते आहे. स्मारकासाठी घेण्यात आलेल्या जागेच्या सातबारा नोंदीदेखील नियम डावलून बदलण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. मुळात आपला नानासाहेबांवर राग नाही. मात्र या स्मारकासाठी जिल्ह्य़ातील विकास काम बाजूला ठेवून निधी द्यावा, असे आपल्याला वाटत नसल्याचे खानविलकर यांनी स्पष्ट केले आहे. मांडव्याचा ब्रेक वॉटर बंधाऱ्याला देण्यासाठी शासनाकडे पैसे नाही, मात्र नानासाहेबांच्या स्मारकासाठी पैसा आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यावर या प्रकरणातील कायदेविषयक बाबी तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ पडलीच तर गावकऱ्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे खानविलकर यांनी स्पष्ट केले आहे. नानासाहेबांचे लाखो अनुयायी आहेत. त्यांना वाटलेच तर आर्थिक मदत देऊन ते स्मारक बांधू शकतील, असे खानविलकर म्हणाले.
दरम्यान, दत्ताजीराव खानविलकर यांनी नानासाहेबांच्या स्मारकाविषयी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत असून त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा काही संबध नसल्याचे राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले आहे. खानविलकर हे व्यवसायाने वकील असून त्यांनी काही लोकांचे वकीलपत्र घेतले आहे. त्यामुळे त्याच्या मताशी पक्षाचा संबध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2013 रोजी प्रकाशित
दत्ताजीराव खानविलकर यांचा राष्ट्रवादीला रामराम;
माजी मंत्री दत्ताजीराव खानविलकर यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत ओसवाल यांच्याकडे पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे स्मारक बांधू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
First published on: 11-03-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dattajirao khanvilkar resign from ncp party