शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील हे आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणार असे आव्हान दिले होते. त्यामुळे शिरूर लोकसभेची ही लढत चुरशीची मानली जात आहे. आज अजित पवार यांची शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी घोडेगाव, आंबेगाव येथे सभा पार पडली. या सभेनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मिश्किल वक्तव्य केले. ‘दिलीप वळसे पाटलांची नार्को टेस्ट का?’, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. राजकीय नेते प्रचारात गुंतले असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, दिलीप वळसे पाटील हे प्रचारात दिसले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षाकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. दिलीप वळसे पाटील हे फक्त शरीराने अजित पवारांसमवेत आहेत. मात्र, ते मनाने तेथे काम करत नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. यावर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवारांनी मिश्किल वक्तव्य करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आपण त्यांची (दिलीप वळसे पाटील यांची) नार्को टेस्ट करू, म्हणजे ते नेमकी शरीराने आणि मनाने कुठे आहेत कळेल”, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : “एकनाथ शिंदे म्हणाले, ईडी-सीबीआयवाले माझ्या मागे लागल्यामुळे…”, राऊतांनी सांगितला अयोध्या दौऱ्यातील प्रसंग

छगन भुजबळांचा प्रचारात सहभाग का नाही?

नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कोणत्याही सभेत दिसले नाहीत. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे बोलले जात आहे.

अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, “छगन भुजबळ यांची मध्यंतरी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ते कुठे प्रचाराच्या सभेत नव्हते. तब्येत चांगली असेल तर बाकीच्या गोष्टी असतात. आता आमचा (अजित पवार गटाचा) एक मतदारसंघ निवडणुकीचा बाकी आहे. मात्र, तरीही आम्ही महायुतीचे घटक आहोत. त्यामुळे सर्व जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे अजित पवार म्हणाले.