जिल्ह्यातील शिवसेनेंतर्गत वाद व घडामोडींसंबंधी माजी आमदार गजाननराव घुगे यांनी शिवसेना वरिष्ठांच्या कानी घातल्या. त्याची दखल घेऊन िहगोली जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुखपदावरून सुहास सामंत यांना काढण्यात आले व त्यांच्या जागी विनायक राऊत यांची नियुक्ती झाली. या नियुक्तीचे घुगे समर्थकांनी रविवारी गांधी चौकात तसेच कळमनुरी येथे फटाके फोडून, पेढे वाटून स्वागत केले.
शिवसेनेतील गटबाजी चांगलीच विकोपाला गेली आहे. वसमत येथे शुक्रवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बठक घेतली. त्यानंतर वानखेडे समर्थकांनी डॉ. मुंदडा यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. पोलीस प्रशासनाने १० शिवसनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचे वसमतमधील शिवसनिकांत तीव्र पडसाद उमटले व मुंदडा समर्थकांनी त्याची दखल घेऊन शनिवारी वसमत येथील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बठक घेतली. बठकीत अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना पुतळा दहनाच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. हा प्रकार संपर्कप्रमुख सुहास सामंत यांच्या चिथावणीमुळे घडला.
 डॉ. मुंदडा यांनी शिवसनिकांसमोर मार्गदर्शन करताना पक्षातील गटबाजीला शिवसनिकांनी थारा देऊ नये, असे आवाहन केले. सुभाष वानखेडे यांना लोकसभेच्या निवडणुकीत हदगाव-किनवट विधानसभा मतदारसंघात मतदानात आघाडी मिळवता आली नाही, त्या ठिकाणी जाऊन झालेल्या पराभवाची कारणे शोधण्याऐवजी वसमतमध्ये येऊन गटबाजी करणे योग्य नसल्याचा सल्ला मुंदडा यांनी या वेळी दिला.
वसमत येथील बठकीत मुंदडा यांचे समर्थक उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, जि.प. शिक्षण सभापती रंगराव कदम, अंकुश आहेर, तानाजी कदम आदींची उपस्थिती होती. वसमत येथील डॉ. मुंदडा यांच्या प्रतीकात्मक पुतळा दहनाची घटना व शिवसेनेतील एकूण घडामोडी याबाबत माजी आमदार गजानन घुगे व डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेना वरिष्ठांच्या कानी सर्व हकिकत घातली. शिवसेनेच्या वरिष्ठांनी याची दखल घेत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत यांना पदावरून कमी करून त्यांच्या जागेवर विनायक राऊत यांची वर्णी लावली.