काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये मागील काही वर्षांत लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच प्रदीप देसाई यांनी केला आहे. या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
रविवारी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देसाई यांनी ग्रामपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनंत गोंधळी यांची एकहाती सत्ता असलेल्या खानावमध्ये त्यांचा एककल्ली कारभार सुरू आहे. ग्रामपंचायतीतर्फे केल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये अनेक वेळा एकाच कामाची दोन बिले काढण्यात आली, तर काही ठिकाणी कामे न करताच परस्पर बिलांची रक्कम हडप करण्यात आली, असा दावा देसाई यांनी केला आहे. सन २००२-०३ या आर्थिक वर्षांत माळी भेरसे स्मशानभूमी रस्ता तयार करण्यासाठी १ लाख ११ हजार ४१७ रुपयांचे बिल काढण्यात आले. प्रत्यक्षात या रस्त्याचे काम झालेले नाही. उसर ते मूळ खानाव रस्त्याच्या कामाचे पैसेही अशाच पद्धतीने हडप करण्यात आले, असा आरोप देसाई यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे केला आहे. याशिवाय इतरही अनेक कामांमध्ये अशाच पद्धतीने पैशांचा अपहार करून जनतेची फसवणूक करण्यात आली असल्याचा पाढा वाचून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी देसाई यांची मागणी आहे.
ग्रामपंचायत परिसरात अनंत गोंधळी यांची प्रचंड दहशत असून त्यांच्यासमोर तोंड उघडण्यास ग्रामस्थ घाबरतात. जिल्हा परिषद तसेच आमदार निधीतून आम्ही गावात विकासकामे करण्याचा प्रयत्न केला, परंतु या कामांना ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र देत नाही, अशी माहिती देसाई यांनी दिली. गेल तसेच एचपी कंपनीत अनंत गोंधळी हे ठेकेदार असून तेथे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांवर गोंधळी यांचा प्रचंड दबाव असून आपल्या विरोधात काम करणाऱ्या कामगाराला कामावरून कमी केले जाते, त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलायला कुणीही पुढे येत नाही, असे देसाई यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस शेकापचे अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, राजेंद्र पाटील, शशिकांत पाडेकर आदींसह खानाव ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी ही माहिती माहितीच्या अधिकारात राजेंद्र कृष्णा पाटील यांनी ही माहिती घेतली असताना दोन वर्षे आपण गप्प का बसलात, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता त्यावर देसाई यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही, तर गोंधळी यांची गावात दहशत असल्याने कुणी पुढे येत नाही, असे एका ग्रामस्थाने सांगून सारवासारव केली. ग्रामपंचायतीत एवढा भ्रष्टाचार असेल तर सलग तीन वेळा लोकांनी त्यांना का निवडून दिले, या पत्रकारांच्या प्रश्नावर देसाई काहीही उत्तर देऊ शकले नाहीत.
निवडणुकीच्या तोंडावर
बदनामीचे कारस्थान
खानाव ग्रामपंचायतीमार्फत जी कामे केली जातात त्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषदेची मंजुरी लागते. त्याखेरीज बिले मंजूर होत नाहीत. खानाव ग्रामपंचायतीमध्ये एका रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. जर भ्रष्टाचार झाला आहे, तर मग आतापर्यंत जिल्हा परिषदेकडे तक्रार का केली नाही? आरोप करणारे स्वत: ग्रामपंचायतीत उपसरपंच आहेत. त्यांनी आतापर्यंत तोंड का उघडले नाही? सर्व आरोपांची जिल्हा परिषदेने चौकशी करावी. जर कुणी दोषी आढळला तर कारवाई करावी, असे माझे खुले आव्हान आहे. आमचा कारभार चांगला नसता तर लोकांनी आम्हाला तीन वेळा निवडून दिले असते का? निवडणुकांच्या तोंडावर केवळ आम्हाला बदनाम करून नागरिकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे हे कारस्थान आहे, असे अनंत गोंधळी  यांनी सांगितले.