नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामातच मोठा ‘गाळा’ काढण्यात आल्याची तक्रार कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीच्या आधारावरच त्यांनी ही तक्रार केली आहे.
नगर जिल्ह्य़ातील कोपरगाव, राहाता, शिर्डी परिसर नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधील पाण्यावर अवलंबून आहे. काळे यांनी त्याअनुषंगाने नाशिक पाटबंधारे कार्यालयाकडे सन २००१ ते सन २०११ अशा दहा वर्षांतील माहिती मागितली होती. प्रामुख्याने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी या काळात किती निधी खर्च झाला, किती गाळ उपसला, साठवणूक क्षमता कितीने वाढली याविषयी माहिती त्यांनी मागितली होती.
महाराष्ट्रातील ब्रिटीशकालीन पहिली पाटपाणी व्यवस्था म्हणून गोदावरी प्रकल्पांची ओळख आहे. ब्रिटीश राजवटीतच सन १९१६ मध्ये गोदावरीवर नांदूर मधमेश्वर येथे प्रकल्प उभारण्यात आला. अजून तीन वर्षांनी त्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. या शंभर वर्षांत हा बंधारा गाळाने भरला असून वर्षांगणिक हा गाळ वाढतोच आहे. त्यामुळे मुख्यत्वे प्रकल्पाची साठवण क्षमता खूपच कमी झाली आहे. ती लक्षात घेऊनच काळे यांनी याबाबतची माहिती मागवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार नांदूर मधमेश्वर धरणातून या दहा वर्षांत केवळ गाळ काढण्यावरच तब्बल ३ कोटी ८५ लाख १८ हजार ६६५ रूपये खर्च झाले आहेत. या विभागानेच ही माहिती दिली. प्रत्यक्षात मात्र या धरणातील २० टक्के गाळही या दहा वर्षांच्या काळात उपसला गेला नसून पर्यायाने साठवण क्षमताही वाढली नाही. सध्याही या धरणात प्रचंड प्रमाणावर गाळ आहे. याचाच अर्थ केवळ कागदोपत्री निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. त्यांनी सन १९८१ पासूनची माहिती मागितली होती, ती देण्यासही या कार्यालयाने टाळाटाळ चालवली आहे. गोदावरीला दरवर्षी पूर येतो या नावाखाली धरणात पुन्हा गाळ साचतो असे या कार्यालयाचे म्हणणेआहे. मात्र तेही साफ खोटे असून एकूणच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी काळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2013 रोजी प्रकाशित
नांदूर मधमेश्वर धरणातील गाळ काढण्याच्या कामातही मोठा ‘गाळा’?
नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामातच मोठा ‘गाळा’ काढण्यात आल्याची तक्रार कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीच्या आधारावरच त्यांनी ही तक्रार केली आहे.
First published on: 13-02-2013 at 05:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay in work of mud cleaning from nandur madmeshwar dam