शहर परिसरात रस्ता सुरक्षा व रेडियम रिफ्लेक्टर बसविण्याच्या नावाखाली वाहनधारकांची होणारी लूट थांबविण्यात यावी व या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आर. आर. बुधवंत यांना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.
आडगाव पोलिसांनी अलीकडेच वाहनधारकांची लूट करणाऱ्या राकेश वाघ, प्रदीप मावार, विक्रम गिल आणि राहुल डांगळे यांना अटक केली. त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आडगाव जकात नाक्याजवळ हे संशयित मालट्रक अडवून रेडियम रिफ्लेक्टर बसविले नसल्याचे कारण देत धाक दाखवून प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलिसांच्या नावाने ५० ते ५०० रुपयांपर्यंत पैसे जमा करीत होते. या संशयितांचे साथीदार कोण आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अंजू सिंघल यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची लूट होत असल्याची भीती व्यक्त करून ही लूट बंद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘तान’ संघटनेचे अध्यक्ष जयेश जातेगावकर यांनी या लुटारूंमुळे नाशिकचे नाव बदनाम होत असल्याचे नमूद केले. दिलीपसिंह बेनिवाल यांनी संपूर्ण देशभरातून नाशिकमार्गे वाहने जात असल्याने त्यांची लूट किंवा त्यांना मारहाण केल्यास त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. निवेदन देताना सिंघल, जातेगावकर, बेनिवाल यांच्यासह राजेंद्र पितानिया, अवतारसिंह बिरदी, सुभाष जांगडा, जयंत सरोदे आदी उपस्थित होते.