सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शंभूराज देसाई व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार विक्रमसिंह पाटणकरांमधील सततच्या कडव्या संघर्षांमुळे बहुचर्चित असलेल्या पाटण तालुक्याच्या राजकारणात सध्या देसाई गटाने पाटणकर गटाची धोबीपछाड चालवली आहे. माथाडी कामगारनेते नरेंद्र पाटील यांच्या रूपाने माजी मंत्री व विद्यमान आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाला एका आमदाराची आणखी ताकद मिळाली असताना, काल निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रतिष्ठेच्या चाफळ व विहे ग्रामपंचायतींत सत्तांतर होऊन देसाई गटाने बाजी मारली. पाठोपाठ पाबळवाडी या ग्रामपंचायतीवरही देसाई गटाचा झेंडा फडकला.
विहे, चाफळ, पाबळवाडी, डिचोली, डाकेवाडी या पाच ग्रामपंचायतींचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले होते. पैकी डिचोली व डाकेवाडी या छोटय़ा ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या. तर उर्वरित ग्रामपंचायतींच्या निकालाअंती देसाई गटाला विहे व चाफळ या मोठय़ा व प्रतिष्ठित ग्रामपंचायतींसह तीन ग्रामपंचायतींची सत्ता मिळाली आहे.
विहे व चाफळ या मोठय़ा ग्रामपंचायतीत सत्तांतर करून देसाई गटाने पाटणकर गटाला जोर का झटका दिल्याने विधानसभेपूर्वीच्या रंगीत तालमीत माजी आमदार शंभूराज देसाई यांची सध्या चलती असल्याचे स्पष्ट होत आहे. काल सोमवारी सकाळी १० वाजता पाटण तहसील कार्यालयात तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला पाबळवाडी ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. त्यामध्ये वॉर्ड क्रमांक एक व दोनमध्ये उमेदवारांना दाखले वेळेत न मिळाल्याने दोन्ही जागा रिक्त राहिल्या, तर पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पाटणकर गटाला दोन जागा मिळाल्या, तर देसाई गटाला तीन जागा मिळाल्याने पाबळवाडी ग्रामपंचायतीत देसाई गटाचे वर्चस्व कायम राहिले. विहे व चाफळ ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन दोन्ही ग्रामपंचायती देसाई गटाने जिंकल्या. चाफळ ग्रामपंचायतीत पाटणकर गटाच्या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, उर्वरित ७ जागांपैकी ५ जागांवर शंभूराज देसाई गटाने बाजी मारून परिवर्तन घडवले. चुरशीने झालेल्या चाफळ ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समिती सदस्य राजेश पवार यांची प्रतिष्ठा फळास गेली नाही. इथे पाटणकर गटाचे ४ तर देसाई गटाचे ५ सदस्य निवडून आल्याने देसाई गटाचाच ‘जय हो’ झाला. विहे ग्रामपंचायतीत गतवेळी देसाई गटाने बाजी मारूनही सरपंचपद पाटणकर गटाकडे होते. या वेळी मात्र, देसाई गटाने जोर की टक्कर देऊन विहे ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली. पाटणकर गटाने वॉर्ड एक व दोनमधून दोन जागा बिनविरोध जिंकल्या होत्या, मात्र नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत देसाई गटाने ७ जागा जिंकल्या, तर पाटणकर गटाला २ जागांवर समाधान मानावे लागले.