देवळा तालुक्यातील चिंचवे येथे पाझर तलावाची जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू असताना सुमारे ५० फुटावरून मातीचा ढिगारा कोसळल्याने मृत्युमुखी पडलेल्या पाच अभियंत्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत मंगळवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केली. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले. मंगळवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
चिंचवे येथे लघुपाटबंधारे विभागांतर्गत सुमारे १० वर्षांपूर्वी बांधलेल्या पाझर तलावातून पाणी सोडण्यात येणारी जलवाहिनी नादुरुस्त झाली होती. दुरुस्तीच्या कामासाठी बंधाऱ्यापासून सुमारे ५० फूट खोल चारी खोदण्यात आली होती. त्याची पाहणी करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता एच. एम. पाटील, एस. जी. सोनवणे, शाखा अभियंता पी. यू. सूर्यवंशी, ए. के. शेवाळे, व्ही. एच. आहेर हे चारीत उतरले असता अचानक मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली हे सर्व जण गाडले गेले. यंत्राच्या साह्याने ढिगारा उपसेपर्यंत दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांचा उपचारासाठी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या अभियंत्यांमध्ये एच. एम. पाटील (रा. शहादा), एस. जी. सोनवणे (दरसवाडी ता. दिंडोरी), पी. यू. सूर्यवंशी (चाळीसगाव), ए. के. शेवाळे (टेहेरे, ता. मालेगाव), व्ही. एच. आहेर यांचा समावेश आहे.