धनगर समाज हा जन्मानेच आदिवासी आहे, मात्र या सवलती देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत आहे. घटनेने दिलेला न्याय्य हक्क आम्हाला मिळाला नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकाराला चांगलाच धडा शिकवू अशा इशारा धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते शालिग्राम होडगर यांनी दिला. आंदोलकांनी या वेळी पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही केले.
राहाता तालुका धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने या मागणीसाठी नगर-मनमाड राज्यामार्गावर रविवारी मेंढय़ांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, या वेळी होडगर बोलत होते. आंदोलकांनी सुरुवातीला पिचड यांच्यासह पद्माकर वळवी व वसंत पुरके यांचा निषेध केला. आंदोलनात धनगर समाज मेंढय़ांसह मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
होडगर म्हणाले, आदिवासी विभाग ही मधुकर पिचडांची मक्तेदारी नाही. या विभागाचे मंत्री म्हणून त्यांनाही धनगर समाजाच्या या मागणीचा विचार करून निर्णय घ्यावाच लागणार आहे. पिचड यांना हे शक्य नसेल तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांना घरी पाठवून दुसरा मंत्री नेमावा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने गेली ६५ वर्षे धनगर समाजावर अन्याय केला आहे. सन १९७६ व ७९ मध्ये दोन वेळा महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा म्हणून शिफारस केली होती. परंतु १९८१ मध्ये पिचड आदिवासी विकाससमंत्री असताना त्यांनी ही शिफारस मागे घेऊन धनगर समाजावर मोठा अन्याय केला. राज्यात ७५ विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य आहे तर, ८० मतदारसंघांमध्ये धनगर समाज आघाडीच्या उमेदवारांना पाडू शकतो. नरेंद्र मोदींच्या लाटेने जसे काँग्रेसचे पानिपत केले तसेच पानिपत या वेळी धनगरांच्या लाटेने होणार. धनगर समाजाचा येत्या ८ दिवसात अनुसूचित जातीत समावेश केला नाहीतर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा होडगर यांनी दिला.  
प्रा. शिवाजी कांदळकर, राधुजी राऊत, नानासाहेब काटकर, कैलास कोळसे, नितीन कापसे, अंकुश भडांगे, प्रदीप भोंडे आदींची या वेळी भाषणे झाली. तहसीलदार सुभाष दळवी यांना निवेदन दिल्यानंतर एक तास चाललेले आंदोलन मागे धेण्यात आले.