केंद्र सरकारने डिझेल विक्रीचे घाऊक आणि किरकोळ विक्रीच्या दरात तफावत ठेवल्याने मच्छीमार, एस. टी. व विविध कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाने पेट्रोल पंपावर किरकोळ डिझेल खरेदी करून प्रतिलिटर ११ रुपये ६१ पैशांची बचत करण्याचा निर्णय घेतला आहे, पण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काही डिझेल पंपांवर डिझेल मिळत नसल्याने एस. टी. विभागाच्या फेऱ्यांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने घाऊक व किरकोळ डिझेल विक्रीच्या दरात तफावत ठेवली आहे. मच्छीमार संस्था, एस. टी. महामंडळ, विविध कारखाने डिझेल घाऊक पद्धतीने खरेदी करीत आहे. त्यांच्या घाऊक खरेदीत वाढ केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ही घाऊक खरेदी प्रतिलिटर ११ रुपये ६१ पैशांनी जास्त पडत आहे.
मच्छीमारांनी आंदोलन करून राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील एस. टी. महामंडळाने खासगी पेट्रोल पंपावर एस. टी. बस नेऊन किरकोळ डिझेल खरेदीवर भर दिला आहे; परंतु जिल्ह्य़ातील काही पेट्रोल पंपांवर पहिल्या दिवशी डिझेलच मिळाले नाही. हा प्रसंग देवगडमध्ये घडला असे जिल्हा एस. टी. प्रमुख नवनीत भानप यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एक लाख किलोमीटर एस. टी. प्रवास करते. त्यासाठी सुमारे २४ ते २५ हजार लिटर डिझेलची गरज लागते. आता हेच डिझेल खासगी पंपांवर भरल्याने ११ रुपये ६१ पैशांचा घाऊक दरवाढीचा भरुदडबचत होणार आहे. त्यामुळे एस. टी. आर्थिक फटक्यातून वाचेल. मच्छीमार बोटी, एस. टी. विभाग व विविध कारखाने घाऊक डिझेल खरेदी करीत असतात, पण केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे डिझेलसाठी एस. टी. विभागाला खासगी पंपांवर भटकंती करावी लागणार आहे.