लोकसभा निवडणुकीच्या (२०१९) प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, “सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं?” यावरून राहुल गांधींविरोधात भाजपाने खटला दाखल केला. सुरत कोर्टाने याचा निकाल देताना राहुल गांधी यांना दोषी ठरवलं आणि त्यांना २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी (लोकसभा सदस्यत्व) रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, आता आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.
बच्चू कडूंची आमदारकी (विधानसभा सदस्यत्व) रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण रोड परिसरात लावले आहेत. यावर लिहिलं आहे की, “आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना साखेच असतात.” यासह या बॅनरवर काही पुणेरी टोलेदेखील पाहायला मिळाले आहेत.
हे ही वाचा >> राहुल गांधींवरील कारवाईची अमेरिकेतही दखल, भारतीय वंशांचे खासदार म्हणाले, “हा गांधीवादी…”
अज्ञानपणातून लावलेले पोस्टर्स : बच्चू कडू
दरम्यान, यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने बच्चू कडू यांना सवाल केला असता आमदार म्हणाले की, “ही सगळी मुर्खता आहे. हे अज्ञानपणातून लावलेले पोस्टर्स आहेत. मला दोन कलमांमध्ये शिक्षा झाली आहे. दोन्ही मिळून केवळ एकाच वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते मला लागू होत नाही. त्यांना काही कामं नाहीत. ही सगळी अज्ञानपणाची लक्षणं आहेत.”