पापुद्रे निघालेल्या भिंती, कोपऱ्यांना गेलेले तडे, छताला लागलेली जळमटे यापेक्षा वेगळी जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था नाही. परिणामी विद्यार्थ्यांचा खासगी शाळांकडे कल वाढू लागला आहे. त्याला आळा घालण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील एका अवलिया शिक्षकाने अफलातून शक्कल लढवली आहे.

उन्हाळी सुटय़ा, स्वत: हातात ब्रश आणि कुंचला घेवून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा वर्गखोल्यांना बोलके करण्याचे काम या शिक्षकाने केले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी रंगीबेरंगी भिंती विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गणपत राऊत यांनी चार हजार ५०० रुपयांची लोकवर्गणी गोळा केली. उस्मानाबाद आणि तुळजापूर या दोन शहरांच्या मध्ये स्थायिक असलेले आपसिंगा हे छोटेखानी गाव.

इयत्ता चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा तेथे आहे. तुळजापूर आणि उस्मानाबाद ही दोन शहरे जवळ असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी या दोन गावी प्राधान्याने पाठवितात. हे सर्व विद्यार्थी आपल्या शाळेत यावेत, यासाठी शाळेचे शैक्षणिक वातावरण सुदृढ असायला हवे. आलेला पाल्य शाळेच्या परिसरात रमून जायला हवा. शैक्षणिक वातावरण मनोरंजक असायला हवे. यासाठी राऊत यांनी काळवंडलेल्या भिंतींना बोलके करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळी सुटय़ा लागल्यानंतर दैनंदिन कामाबरोबरच शाळेचे रंगकाम करण्यासाठी या शिक्षकाने स्वत मजुराचे काम केले. रंगकाम करण्यासाठी आठ हजार रुपयांची मजुरी अपेक्षित होती. हा खर्च वाचविण्यासाठी राऊत यांनी गावातील विद्यार्थी, पालक यांचे सहकार्य घेतले आणि दहा दिवसांत शाळेचे रूप पालटून टाकले. शाळा सुरू होण्यापूर्वीच गावातील विद्यार्थी रंगीबेरंगी भिंती पाहून शाळेच्या आवारात रमू लागले आहेत. राऊत हे मागील चार वर्षांपासून आपसिंगा येथे कार्यरत आहेत. त्यापूर्वी शाळेला केव्हा रंग देण्यात आला, हे त्यांना माहीत नाही. मात्र, चार वर्षांनंतर वर्गखोल्यांची अवस्था आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम पाहून त्यांनी ही शक्कल लढवली आणि स्वत रंगकाम करून भिंतींवर उजळणी, पाढे, लेखक आणि त्यांची पुस्तके, संत, महात्मा यांचे जन्मस्थळ आणि जन्मसाल, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी आदी विविध राष्ट्रीय प्रतिके आकर्षक रंगसंगती वापरून त्यांनी रेखाटली आहेत.

याचा गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थी संख्येवरही नक्की अनुकूल परिणाम होईल, अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली आहे.

हसत खेळत शिक्षण : राऊत

ताणतणाव न घेता आनंदाने हसत खेळत शिक्षण दिल्यास त्याचा गुणवत्ता वाढीवर नक्की परिणाम होतो. शैक्षणिक वातावरण बोलके असेल तर विद्यार्थी आपोआप त्यांच्या स्वत:च्या भाषेत व्यक्त व्हायला सुरू होतात. आनंददायी व ज्ञानरचनावादी शिक्षण निसर्गातील रंगांच्या मदतीने मुलांच्या मनापर्यंत पोहोचविणे सहज शक्य होते. पुस्तकातील उतारे भिंतीवर, फरशीवर चितारल्याने पुस्तकाचे आणि दप्तराचे अनाहूत ओझे कमी होऊन विद्यार्थी शाळेच्या परिसरात आनंदाने रमून जातो. त्यासाठीच या भिंती बोलक्या करण्याचे काम केले असल्याची प्रतिक्रिया गणपत राऊत यांनी दिली आहे.