चिपळूण : पावसाळय़ामध्ये चिपळूण शहरात निर्माण होऊ शकणाऱ्या गंभीर पूरस्थितीच्या काळात जलतरणपटूंचे साहाय्य घेण्याची अभिनव योजना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आखली असून या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांची निवड चाचणी नुकतीच घेण्यात आली.

गेल्या वर्षी २२ जुलै रोजी आलेल्या महापुराने चिपळूण शहरात एकच हाहाकार उडाला होता. बचावकार्य वेळेत सुरू न झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर येथील प्रशासनासह चिपळूण पालिका नागरिकांच्या टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे या वर्षीच्या पावसाळय़ात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जायचे याबाबत विचारविनिमय आणि उपाययोजना सुरू झाली आहे.

शहरातील गांधारेश्वर मंदिराच्या डोहात ३७ जलतरणपटूंनी चाचणी पूर्ण केल्याने त्यांची प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. या तरुणांना संकटकाळात साहाय्यासाठी खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सामाजिक कामामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शहरातील मुरादपुर, शंकरवाडी, पाग व बाजारपेठ परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या चाचणीमध्ये वाशिष्ठी नदीपात्राच्या मध्यवर्ती भागात जाऊन परत काठावर येणाऱ्या तरुणांची या प्रशिक्षणासाठी निवड केली. पुणे येथील अस्तित्व लाइफ सेिव्हग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडह्णचे संचालक भूषण देशपांडे यांनी संबंधित तरुणांना मार्गदर्शन केले. पावसाळय़ात पूर आणि इतर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने या संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेमार्फत आपत्कालीन बचाव कार्यासंदर्भात येत्या १३ ते १५ मे दरम्यान सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे, व्यापारी, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा यांचा सहभाग राहणार आहे. या शिबिरात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीचे पोहता येणारे व पोहता न येणारे असे दोन गट तयार केले जाणार आहेत. पूर आपत्तीला कसे तोंड द्यावे, त्याची तयारी कशी करावी, स्वत:चा जीव व दुसऱ्याचा जीव कसा वाचवावा, जीवरक्षक साहित्याचा वापर कसा करावा, वित्तहानी कशी टाळावी आदींबाबतचे प्रशिक्षण शिबिरात देण्यात येणार आहे.