हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या हरहुन्नरी संगीतकारांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘द डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड’ या उपक्रमाची नुकतीच सांगता झाली. गेले वर्षभर सुरू असलेल्या या सांगीतिक प्रवासातील अखेरचा कार्यक्रम पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात नुकताच झाला. ‘रहे ना रहे हम’ या शीर्षकांतर्गत झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार रोशन व रवी यांना सांगीतिक आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात रोशन यांची, तर उत्तरार्धात रवी यांची एकापेक्षा एक अवीट गोडीची गाणी सोनाली कर्णिक, सर्वेश मिश्रा, आकांक्षा भोईर, नेहा दातार, नितीन डिस्कळकर, उल्हास भट, अजय ठाकूर आणि जयंत टिळक या गायकांनी सादर केली. ‘ये वादियाँ, ये फिजाए’ (सर्वेश) या गाण्याने या मैफलीची सुरुवात झाली. यानंतर ‘इन हवाओंमे’ (नितीन), ‘आगेभी जाने ना तू’ (नेहा), ‘मिलती है जिंदगी में’ (आकांक्षा), ‘छू लेने दो नाजूक होठों को’ (जयंत), ‘तुमही मेरे मंदिर’ (सोनाली) या गाण्यांनी मैफलीत रंग भरले. याशिवाय ‘ये रातें ये मौसम’, ‘तुम्हारी नजर’, ‘पाँव छू लेने दो’ आदी युगुलगीतांमुळे ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. मूळ गाण्यानुसार गायकांनी व वादकांनी सादरीकरण केल्याने यातील अनेक गाण्यांना वन्स मोअर मिळाला. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील तब्बल ३२ गाण्यांची मेजवानी या वेळी मिळाल्याने रसिकांच्या गतस्मृतींना उजाळा मिळाला. मंदार खराडे यांचे ओघवते व माहितीपूर्ण निवेदन या मैफलीसाठी पूरक ठरले.
उपक्रमालाच वन्स मोअर!
या उपक्रमाची संकल्पना पनवेल कल्चरल सेंटरचे विश्वस्त जयंत टिळक यांची होती. वर्षभरात कोणते पाच कार्यक्रम होणार, तसेच ते कोणत्या दिवशी होणार, याचे वेळापत्रक उपक्रम सुरू होतानाच आखण्यात आले होते. विशेष म्हणजे, या वेळापत्रकात तिळमात्र बदल न होता ते काटेकोरपणे पाळण्यात आले. ओ. पी. नय्यर, नौशाद, मदनमोहन, सलील चौधरी आणि रोशन-रवी या सहा दिग्गज संगीतकारांना या उपक्रमाद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली. पनवेलमध्ये या प्रकारचा उपक्रम प्रथमच झाला. यानिमित्ताने वार्षिक सदस्यत्वाचा पर्याय रसिकांसमोर ठेवण्यात आला व या कल्पनेसही दणकून प्रतिसाद लाभला. प्रत्येक कार्यक्रमापूर्वी रसिकांकडून त्यांच्या आवडत्या गाण्यांची सूची मागवणे, कार्यक्रमादरम्यान अभिप्राय पत्रिका देणे, संबंधित संगीतकाराची माहिती पुस्तिका उपस्थितांना कार्यक्रमात देणे, या पुस्तिकेत आधीच्या कार्यक्रमाबद्दलचे अभिप्राय प्रसिद्ध करणे आदी वैशिष्टय़ांमुळे हा उपक्रम व त्याचे आयोजन आगळेवेगळे ठरले. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील गाण्यांवर आधारित या प्रकारचे कार्यक्रम पनवेलमध्ये होत नसल्याने ‘डिव्हाइन म्युझिक’ने हा उपक्रम सुरूच ठेवावा, अशी मागणी अनेक रसिकांनी केली.