दोंडाईचा-शहादा रस्त्यावर मंगळवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ – प्रवासी वाहतूक करणारी मिनी डोअर यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ठार तर १४ जण जखमी झाले. या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोंडाईचा-शहादा रस्त्यावरील द्वारका ढाब्याजवळ हा अपघात झाला. प्रवाशांना घेऊन निघालेल्या मिनी डोअरला भरधाव आलेल्या स्कॉर्पिओने धडक दिली. त्यात मिनीडोअरमधील सर्वच्या सर्व म्हणजे १४ प्रवासी गंभीर जखमी झाले. आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. तथापि, तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता. उर्वरित जखमींना तातडीने धुळ्याच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. स्कॉर्पिओची धडक इतकी जबरदस्त होती की, मिनीडोअरचा पूर्णत: चक्काचूर झाला. महत्वाची बाब म्हणजे, खासगी स्कॉर्पिओवर ‘पोलीस’ असे नांव असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची मुले ही गाडी चालवित असल्याचा संशयही स्थानिकांनी व्यक्त केला. अपघातातील मृतांची नांवे सायंकाळी उशिरापर्यंत समजू शकली नव्हती. परंतु, रुग्णालयातील सूत्रांनी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. जखमींमध्ये महिला व लहान बालकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.