राज्यातील तब्बल २६ वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना पदोन्नती व बदली करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदलीचे आदेश काढले आहेत. यात प्रामुख्याने अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक(कॅम्पा) डॉ. ए.के.झा यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली असून, वनविकास महामंडळाच्या महासंचालकपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन) ए.एस.के. सिन्हा यांना, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) या पदावरून ३० जूनला सेवानिवृत्त झालेल्या अनिल मोहन यांच्या जागेवर पदोन्नती देण्यात आली आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन-वन्यजीव) डॉ. एस.एच. पाटील यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) ए.के. झा यांच्या जागेवर बदलली करण्यात आली आहे.
अमरावती वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) वीरेंद्र तिवारी यांची मंत्रालयातील महसूल व वनविभागात बदली करण्यात आली आहे. सांगली वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक ऋषिकेश रंजन यांची नागपूर वनविभागात मुख्य वनसंरक्षक म्हणून आणि यशदा, पुणे येथील उपमहासंचालक नरेश झुरमुरे यांना कुंडल येथील वनविकास आणि व्यवस्थापन अकादमीच्या महासंचालकपदावर पदोन्नती देण्यात आली आहे. नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एस.बी. शेळके यांना नागपूर वनविभागात मुख्य वनसंरक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. गोंदियाचे उपवनसंरक्षक एस.व्ही रामाराव यांना त्यांच्या जागेवर पाठविण्यात येईल.
नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) पी.के. महाजन यांना अमरावती वनविभागात वनसंरक्षक (कार्यआयोजना) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. नवनियुक्त उपवनसंरक्षक एस.के. थापलीयाल यांना ते कार्यभार सोपवतील. बुलडाण्याचे उपवनसंरक्षक डी.डी. गुजेला यांना सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील वनविकास आणि व्यवस्थापन अकादमीच्या संचालकपदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
पूर्व मेळघाटचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, परतवाडाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, अकोल्याचे उपवनसंरक्षक व्ही.ए. धोकटे यांची गोंदिया, पूर्व मेळघाट आणि जुन्नर येथे बदली करण्यात आली आहे.
वर्धा वनविभागाचे उपवनसंरक्षक बी.जे. भुतडा यांना नागपूर वनविभागात वनसंरक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. इतर पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये जी.टी. चव्हाण, एम.एम. कुळकर्णी, आर.एस. कदम, पी.जी. राहुरकर यांचा समावेश आहे, तर बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये डी.एम. भट्ट, व्ही.बी. सूर्यवंशी, ए.एस. आपटे, सत्यजित गुजर, आर.एम. नाईकवाडे आणि जी.डी. वाळसे यांचा समावेश आहे.