इंग्रजी, मराठी वाङ्मयाचे साक्षेपी अभ्यासक व विद्यार्थिप्रिय प्राध्यापक चंद्रशेखर जहागीरदार यांचे सोमवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा, सून असा परिवार आहे.
डॉ. जहागीरदार गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत स्थायिक झाले होते. २००५मध्ये शिवाजी विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर साहित्य अकादमीच्या एका मोठय़ा प्रकल्पासोबत अनेक वाङ्मयीन उपक्रमांशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. जहागीरदार यांचे महाविद्यालयीन व पदव्युत्तर शिक्षण औरंगाबादेत झाले. इंग्रजी साहित्यात एम. ए. झाल्यानंतर अंबाजोगाई महाविद्यालयात ७ महिने व नंतर मराठवाडा विद्यापीठात अधिव्याख्यातापदी रुजू झाले. १९७९पर्यंत औरंगाबादेत इंग्रजीच्या अध्यापनानंतर ते शिवाजी विद्यापीठात रुजू झाले. तेथे २६ वर्षे कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांच्यावर गौरवग्रंथही प्रकाशित झाला. अमेरिकन व भारतीय इंग्रजी साहित्य, समीक्षा आणि तौलनिक साहित्य हे त्यांचे अभ्यास विषय होते. मराठी साहित्यातही त्यांनी विपुल लेखन केले. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’सह अनेक मराठी कादंबऱ्यांची त्यांनी अतिशय तटस्थपणे समीक्षा केली. न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. सुधीर रसाळ, कौतिकराव ठालेपाटील, डॉ. सतीश देशपांडे यांच्यासह नांदेडचे प्रा. तु. शं. कुलकर्णी, डॉ. एल. एस. देशपांडे, भु. द. वाडीकर, डॉ. शैलजा वाडीकर यांनी डॉ. जहागीरदार यांना श्रद्धांजली वाहली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr chandrashekar jahagirdar passed away because of heart attack
First published on: 03-04-2013 at 03:52 IST