वेगळ्या विदर्भ राज्याच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना विदर्भवादी नेत्यांनी गळ घालणार असले तरी डॉ. आमटे यांच्याकडून त्याला नकार मिळण्याची शक्यता जास्त आहे. पावसामुळे हेमलकसाची संपर्क यंत्रणा ठप्प झाल्याने सध्या आमटे यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.
तेलंगण राज्याला काँग्रेसकडून हिरवा कंदील दाखवण्यात आल्यानंतर स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे. विदर्भातील काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार व विजय दर्डा यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून या मागणीवरील चर्चा पुन्हा सुरू केली आहे. विदर्भातील काँग्रेसचे अनेक नेते या मुद्दय़ावर पुन्हा आंदोलन छेडता येईल का, याची चाचपणी करण्यात सध्या गुंतले आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी,‘येत्या काळात होणारे आंदोलन सर्वपक्षीय असावे व त्याचे नेतृत्व डॉ. आमटे यांनी करावे,’अशी भूमिका जाहीर केली. ते करण्यापूर्वी पुगलिया स्वत: आमटे यांच्याशी बोलले. आमटे यांनी त्यावर, विचार करून सांगतो, असे उत्तर दिल्याने विदर्भवादी नेत्यांच्या आशा बळावल्या. आमटे नेतृत्वासाठी होकार देतील का, या प्रश्नावर सध्या विदर्भात चर्चा सुरू झाली आहे.
डॉ. आमटे यांच्या प्रकल्पाला देशभरातील शेकडो व्यक्ती व संस्था दरवर्षी भेट देत असतात. या प्रकल्पांना मदत करणाऱ्यांमध्ये उर्वरित महाराष्ट्रातील अनेक संस्था व संघटनांनी नेहमी पुढाकार घेतला आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला उर्वरित महाराष्ट्राचा ठाम विरोध आहे. या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारून आमटे सर्वाची नाराजी ओढवून घेणार नाहीत असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. सध्या नागपूरला असलेले त्यांचे सुपुत्र अनिकेत आमटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.