सुक्या मासळीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने धाकटय़ा डहाणूतील मच्छीमार हवालदिल

सुक्या बोंबीलचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाकटय़ा डहाणूतील मच्छीमार हवालदिल झाले आहेत. मुसळधार पावसाने सुक्या मासळीचा हंगाम नासवल्याने यावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांसमोर आर्थिक समस्या आ वासून उभी आहे. वर्षभराची बेगमी सुक्या मासळीमुळे मिळते. सुकी मासळी खराब झाल्याने धाकटय़ा डहाणूमध्ये प्रत्येक कुटुंबाचे सरासरी एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दिवाळीच्या काळात डहाणू परिसरात ‘कवी’ची मासेमारी होते. हा काळ बोंबीलच्या वाढीसाठी चांगला काळ असल्याने मच्छीमारांना उत्पन्न मिळवून देणारा काळ मानला जातो. डहाणूजवळीत समुद्रात ३५० बोटींतून बोंबलाची मासेमारी केली जाते. मच्छीमार बोटीसाठी डिझेल, खलाशी, मजुरी, बर्फ, जाळी असा खर्च केला जातो. सुक्या मासळीसाठी उपयुक्त असलेल्या या हंगामासाठी या दोन ते तीन महिन्यांच्या काळात प्रत्येक कुटुंबाला एक ते दीड लाखांचे उत्पन्न मिळते. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सप्टेंबर ते एप्रिल हे आठ महिने सुक्या मासळीच्या व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. हवेची आद्रता आणि वारा यांमुळे बोंबील आणून ते  सुकवण्यासाठी हा मोसम चांगला मानला जातो. मात्र पावसाने यंदा संपूर्ण हंगाम वाय घालवला आहे.

सुकवण्यासाठी बांबूच्या वनारी

बोंबील सुकवण्यासाठी बांबूच्या वनारी बांधल्या जातात. धाकटी डहाणूच्या किनाऱ्यावर अनेक ठिकाणी या वनारी नजरेस पडतात. ५० ते ६० फुटापर्यंत या वनारी बांधलेल्या असतात. ओले बोंबील आणल्यानंतर ते या वनारीवर सुकवण्यासाठी टांगून ठेवले जातात. घरातील महिला बहुतेक ही कामे करतात. सिमेंटचे ओटे किंवा पसरट जमिनीवर करंदी, सुकट, सोडे सुकवले जातात. त्याशिवाय मांदेली, बांगडा, करदी, शिंपले, मोरी, खावटी हे मासेही सुकवण्यात येतात.

सुक्या मासळीच्या व्यवसायात संपूर्ण कुटुंब कामात गुंतलेले असते. घरातील महिला वनारीला बोंबील टांगण्याचे काम करतात. या कामात मोठे श्रम घ्यावे लागते पण पावसामुळे मासळी नासली असून श्रम वाया गेले आहे. – जयश्री धानमेहेर, मच्छीमार महिला

पावसाचे पाणी लागल्यावर जास्त वेळ मासळी टांगून ठेवू शकत नाही. मच्छीमारांच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झाले नाहीत. त्यांना भरपाई देण्याची गरज आहे. -अशोक अंभिरे, अध्यक्ष, मच्छीमार सोसायटी

हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई मिळते. मात्र मच्छीमारांना मिळत नाही. दोन वर्षांपूर्वी मत्स्य विभागाकडून पाहणी करण्यात आली. मात्र भरपाई मिळाली नाही. – वशीदास अंभिरे, मच्छीमार नेते, धाकटी डहाणू