नराश्यातून बाहेर पडून कामाला जुंपलेल्या शेतकऱ्यांमध्ये मान्सून लांबणार असल्याने भीती निर्माण झाली आहे. जून अखेरीपर्यंत पाऊस आला नाही, तर कडधान्याची लागवडच होणार नाही. दुष्काळात जगविलेला ऊस जळून खाक होऊन त्याचा ग्रामीण अर्थकारणाला गती देणाऱ्या साखर कारखानदारीवर विपरीत परिणाम होणार आहे.

हवामान खाते, स्कायमेटने यंदा वेळेवर पाऊस येईल असे भाकीत वर्तविल्याने दुष्काळामुळे नराश्याच्या गत्रेतून शेतकरी बाहेर पडला. मोठय़ा उमेदीने तो खरिपाच्या तयारीला लागला होता. पण आता पाऊस लांबल्याने त्याच्या पोटात गोळा उठला आहे. नगर जिल्ह्याच्या नेवासे, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर या दुष्काळी भागात उडीद व मुगाची मोठय़ा प्रमाणात लागवड होते. पाऊस लांबला तर ही पिके हातची जाणार आहेत. राज्यातील १ हजार बियाणे कंपन्यांपकी २५० कंपन्या कडधान्याचे बियाणे विकतात. देशात सुमारे ३ हजार कोटींची बियाणे विकली जातात. त्यात राज्याचा मोठा वाटा आहे. पाऊस नसल्याने बियाणे पडून आहे. त्यामुळे बियाणे कंपन्या अडचणीत आल्या आहे. मूग व उडीद ही दोन्ही कडधान्य जिरायत क्षेत्रात घेतली जातात. बागायती वाण विकसित झालेले नाही. जूननंतर त्यांची पेरणी केली तर त्यावर भुरी रोग येतो. त्यामुळे पाऊस लांबला तर कडधान्यापासून शेतकरी लांब जाण्याची शक्यता आहे. त्याने बाजारात मोठी दरवाढ होऊन महागाई वाढीला हातभार लागेल.

जिल्ह्यात ऊसशेती बहरलेली होती. तीन वर्षांपासून पाऊस नसल्याने ऊस लागवड बंद झाली. शेतकरी अन्य पिकांकडे वळणार असला तरी त्याच्यापुढील संकट गेलेले नाही. पर्यायी पीक पद्धतीचा अवलंब नमनालाच अडचणीचा ठरला आहे. जिल्ह्यात सरासरी सव्वालाख हेक्टरवर उसाचे पीक घेतले जाते. त्यात यंदा एक लाख हेक्टरने घट झाली असून अवघा २५ हजार हेक्टरमध्ये ऊस उभा आहे. तो जनावरांच्या चाऱ्याकरिता वापरला जात आहे. पाऊस लांबल्यामुळे हा ऊस चाऱ्यालाच जाईल. सध्या जिल्ह्यात जनावरांकरिता चाऱ्यासाठी बारामती, जुन्नर भागातून ऊस आणला जातो. हा चाराही मिळेल की नाही, ही शंका आहे. चाऱ्याचा प्रश्न आणखी बिकट होईल. ऊस नसल्याने साखर कारखाने चालू होणार नाहीत. जे चालू होतील त्यांचे गाळप उशिरा होऊन उसाची पळवापळवी व कारखान्यांमध्ये संघर्ष होईल. ग्रामीण अर्थकारणाला मोठा धक्का बसेल. जुलमध्ये पेरण्या झाल्या, तर पिकांवर कीड व रोगांचा फैलाव होतो. त्याचा मोठा फटका बसेल. सध्या दुष्काळात दुधाचे उत्पादन २५ टक्क्याने घटले आहे. ते आणखी २५ टक्के घटेल. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूरही अडचणीत येणार आहे. सध्या मजुरांना कामे नाहीत. त्यांच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण होईल.

जिल्ह्यात अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा होतो. मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवण्याची भीती आहे. श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर या शहरांबरोबरच सोनई, लोणी, देवळाली प्रवरा या मोठय़ा गावांचा पाणी प्रश्न बिकट होऊ शकतो. १५ जुलपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असल्याचे नियोजन करण्यात आले. त्यापुढे मात्र गंभीर पेच उद्भवेल. राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधनावर गेल्या तीन वर्षांपासून विपरीत परिणाम झाला आहे. आता पाऊस लांबला तर संशोधन ठप्प होईल. दुष्काळामुळे विद्यापीठ बीजोत्पादन करू शकले नाही. यंदा सोयाबीन, तूर, मूग, उडीद याचे बियाणे विद्यापीठाकडे विक्रीसाठी उपलब्ध झाले नाही. भविष्यात बीजोत्पादनावर विपरीत परिणाम होईल. दरवर्षी खरीप कांद्याच्या बियाणांकरिता रांगा लागातात. पोलिसांनी यापूर्वी दोनदा लाठीमार केला होता. यंदा बियाणाला मागणीच नाही. खरीप कांदा लागवड अडचणीत आली आहे.

कडधान्य पेरणीवर संकट

कृषी शास्त्रज्ञ डॉ. शरद गडाख यांनी सांगितले, की जून अखेरीपर्यंत पाऊस पडला नाही तर कडधान्य पेरणी होणार नाही. तसेच जुलमध्ये पाऊस लांबला तर अन्य पिके अडचणीत येतील. पण जुलमध्ये पाऊस झाला तर संकट कमी होईल. कृषी विद्यापीठातील पीएच.डीचा  विद्यार्थी अंकुश चोरमुले यांनी सांगितले, जूनमध्ये पाऊस झाला नाही, जुलमध्ये पेरणी झाली, तर खरीप पिकांचे उत्पादन घटेल तसेच पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव होईल.

निसर्गाचे संकेत

निसर्गात पावसाचे संकेत नेहमी मिळतात. पाऊस वेळेवर होणार असेल, तर एप्रिलमध्ये मधमाश्यांच्या पोळ्याचे विभाजन होते. कावळे व चिमण्या घरटे बांधतात. मुंग्या वरच्या भागात जातात. पण यंदा एप्रिलमध्ये हे घडलेच नाही. मे मध्ये मधमाश्यांच्या पोळ्याचे विभाजन झाले. त्यांनी आता पोळे बांधायला सुरुवात केली. कावळे व चिमण्या आता घरे बांधत आहे. मुंग्या वरच्या भागात आताच जात आहेत. त्यामुळे १ महिना पाऊस लांबेल असे संकेत निसर्गाकडून मिळाले होते. हवामान खात्यालाही अंदाज होता पण त्यांनी दिलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यातील नराश्य कमी झाले, असे कृषी क्षेत्रातील एका अभ्यासकाने सांगितले. कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी चालू महिना अखेरीपर्यंत पाऊस झाला तरी कडधान्य घेता येईल, मात्र लांबला तर मोठे संकट आहे. १५ जुलपर्यंत प्रतीक्षा आहे. तो पर्यंत पाऊस झाला तरी शेतीला सुगीचे दिवस येतील असे सांगितले.