महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न, अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर

पालघर : महावितरण पालघर विभागाअंतर्गत चक्रीवादळामुळे खंडित झालेल्या वीजपुरवठय़ापैकी ८० टक्के पुरवठा पूर्ववत करण्यात आला आला आहे. उर्वरित कामांसाठी महावितरणने अतिरिक्त मनुष्यबळ कार्यरत केले असून जिल्ह्यत ग्रामीण भागात वीजपुरवठा कार्यरत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पालघर विभागातील खंडित झालेला अधिकतर पुरवठा शुक्रवापर्यंत पूर्ववत होईल, असा दावा  महावितरण विभागाने केला आहे.

पालघर विभाग महावितरणकडे कायम व कंत्राटी अशा पद्धतीचे ७५० कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत.  चक्रीवादळाच्या अनुषंगाने अतिरिक्त ५०० कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने तयार ठेवण्यात आले होते.  सोमवारी ज्या वेळेला प्रत्यक्षात चक्रीवादळाची झळ बसली त्या वेळी अधिकतर स्थानिक असणाऱ्या नागरिकांच्या घरांची पडझड झाली.  वादळाच्या दिवशी पावसात भिजून आजारी पडल्याने अनेक कामगार  कामावर आले नाहीत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने कोसळलेले खांब  पूर्ववत उभे करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यात अडचणी येत होत्या असे  महावितरण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

सफाळा, केळवा, बोईसर पालघर शहरातील उर्वरित भागातील वीजपुरवठा बुधवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महावितरण विभागाने अतिरिक्त मनुष्यबळ कार्यरत केले आहे. पालघर, सफाळे व बोईसर भागातील वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक हजार अतिरिक्त मनुष्यबळ कार्यरत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांनी दिली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागांत विशेषत: घनदाट जंगलातून जाणाऱ्या वीज वाहिन्यांवर पडलेले झाड काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वीजपुरवठा कार्यरत होताना कुठेही अपघात होऊ नये तसेच जीवित हानी होऊ नये याकरिता विशेष दक्षता घेतली जात असल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी विलंब होत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

पालघर विभागाची व्याप्ती

– उपविभाग:९

– शाखा कार्यालय :४०

-उपकेंद्र: ३८

– ३३ केव्ही वाहिन्या: ६७

– २२ केव्ही वहिन्या: १४

– ११ केव्ही वहिन्या: १६४

– रोहित्र: ५०७३

– ३३ केव्ही वाहिन्यांची लांबी: ४६२ किलोमीटर

– २२ व ११ केव्ही उच्च दाब वाहिनींची लांबी: ८२८ किलोमीटर

आज परिस्थिती पूर्ववत होणार

पालघर महावितरण विभागातील तीन लाख ७४ हजार ६७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.  त्यापैकी दोन लाख ५४ हजारपेक्षा अधिक ग्राहकांची सेवा २० मे च्या सकाळपर्यंत पूर्ववत करण्यात आली होती. विभागातील सर्व उपकेंद्र, स्विचींग स्टेशन तसेच ११ केव्ही फिडर कार्यरत झाले आहे. ८१५ बाधित गावांपैकी ६०० गावांचा वीजपुरवठा सुरू झाला आहे.  उच्च दाबाचे १७४ बाधित खांबांपैकी २४ खांब पुन्हा उभारण्यात आले आहेत. ३०० लघु खांब पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.  १६५ बाधित मोबाइल टॉवरपैकी ८५  टॉवरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.  सर्व २० करोना रुग्णालय आणि प्राणवायू केंद्रांना वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा महावितरण विभागाकडून करण्यात आला आहे.