शेतकऱ्यांसाठी एक वेगळी प्रकाशवाट’..

कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ आदी समस्यांमुळे जेरीस आलेल्या शेती व्यवसायास पूरक उद्योगांची जोड दिली तर कुटुंबांचे भवितव्य घडविता येते हे सिद्ध करून शेतकऱ्याच्या आयुष्याला नवी दिशा देणारे प्रयोग कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुरू आहेत. या प्रयोगांना प्रसिद्धीची हाव नाही, पण शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच या प्रयोगाच्या यशाची खूणगाठ असते. आता या जिल्ह्य़ात ‘अंडय़ांचे गाव’ नावाचा एक नवा प्रयोग सुरू झाला आहे. महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या आणि घराला आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या प्रयोगाचे यश ही शेतकऱ्यांच्या आयुष्यावरील नैराश्याचे सावट पुसणारी प्रकाशरेषा ठरणार आहे.

houses, Mulund,
१४ वर्षांपासून घरांची प्रतीक्षा, मुलुंडमधील गृहप्रकल्पाचे केवळ २५ टक्केच काम पूर्ण
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
amravati orange producer farmers marathi news
गुढीपाडव्याची पहाट संत्री उत्पादकांसाठी ठरली भयावह; गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात दररोज सुमारे ५० हजार अंडी विकली जातात. ही अंडी शेजारच्या कर्नाटकातून सिंधुदुर्गातील बाजारात आयात होतात. अंडी आयात करण्याऐवजी जिल्ह्य़ातच अंडय़ांचे उत्पादन सुरू केले तर रोजगाराची संधी निर्माण होईल, आर्थिक स्थैर्य लाभेल आणि महिलांच्या हाताला काम मिळून महिला सक्षमीकरणही होईल अशा विचारातून ‘अंडय़ांचे गाव’ निर्माण करण्याची जबाबदारी झाराप येथील ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ने उचलली. जिल्ह्य़ातील दिनेश म्हाडगुत यांचे वडील कर्नाटकात जाऊन भाताचा कोंडा विकायचे. तेथे त्यांची एका अंडी व्यापाऱ्याशी ओळख झाली आणि गेल्या १५ वर्षांपासून अंडय़ांचा व्यापार त्यांनी सुरू केला. दरमहा १५ लाख अंडी ते सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वितरित करतात. एवढी अंडी बाहेरून आणण्यापेक्षा, घरोघरी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला तर हक्काच्या उत्पन्नाचे साधन तयार होईल, असा विचार जिल्ह्य़ातील काही नेत्यांना सुचला आणि आखणी सुरू झाली. जिल्हा मध्यवर्ती बँक, भगीरथ संस्था, पुणे येथील वेंकटेश हॅचरीज, स्थानिक शेतकरी महिला आणि दिनेश म्हाडगुत यांच्या बैठका झाल्या, प्रकल्पाची आखणी झाली, आणि जिल्हा बँकेने कर्ज योजनाही तयार केली. तीन वर्षे कालावधीचे प्रत्येकी एक लाख रुपयांचे कर्ज देण्याची तयारी बँकेने दाखविली, प्रशिक्षणाची जबाबदारी ‘भगीरथ’ने उचलली, ‘वेंकटेश’ने पक्षी, पिंजरे, खाद्य आणि तांत्रिक-वैज्ञानिक सल्ला देण्याची तयारी दर्शविली आणि म्हाडगुत यांनी विक्री-वितरणाचे काम स्वीकारले. माणगाव परिसरातील वाडोस, गोठोस, निवजे, नानेली, घावनळे, आंबेरी, कांदुळी इत्यादी गावे प्राथमिक प्रयोगासाठी सिद्ध झाली, आणि प्रत्येक शेतकरी महिला तीनशे ते पाचशे पक्षी पाळून त्यांचे दैनंदिन व्यवस्थापन करेल, अशी योजना तयार झाली.

प्रकल्प संपूर्णपणे ‘महिलाकेंद्री’ राहावा असा संस्थेचा प्रयत्न आहे. प्रत्येक पक्षी वर्षांकाठी सुमारे ३१० अंडी देतो. महिलांनी दररोज किमान दोन तास या प्रकल्पासाठी आपापल्या घरी काम केले, तर महिन्याकाठी दोन ते अडीच हजारांचे उत्पन्न मिळेल व तीन वर्षांनंतर कर्ज-व्याजाचा बोजा नसल्याने हे उत्पन्न आणखी वाढेल. पक्ष्यांची काळजी घेण्यासाठी स्थानिक महिलांनाच पक्षी आरोग्याचे प्रशिक्षण देऊन ‘पशू-पक्षी सखी’ (बेअरफूट डॉक्टर) निर्माण करण्याचीही संस्थेची योजना आहे. गेल्या महिनाअखेरीस या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली, आणि काही घरांमध्ये कोंबडय़ांचा किलबिलाट सुरू झाला. पिंजऱ्यात अंडी दिसू लागली, आणि अंडय़ांचे गाव प्रत्यक्ष आकारालाही आले. कोकणात विकासाची एक नवी वाट निर्माण झाली आहे.

पर्यटनाची आवड असलेली माणसे ताडोबाला वाघ पाहायला जातात. भिलारला ‘पुस्तकाचे गाव’ झाले आहे. सिंधुदुर्गातील ‘अंडय़ांचे गाव’देखील काही वर्षांत पर्यटनाचे आणि शेतकऱ्यांच्या विकासाचे प्रेरणास्थान बनेल, असा ‘भगीरथ’चे डॉ. प्रसाद देवधर यांचा विश्वास आहे.