बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी अटक केलेल्या अरुण परेरा, वरवरा राव आणि वर्नन गोन्साल्विस या तिघांना बुधवारी दुपारी पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले.

कथित नक्षलवादी समर्थक वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा या पाच जणांना पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यातील सुधा भारद्वाज यांना ३० ऑगस्टपर्यंत नजर कैदेत ठेवण्यात येणार आहे. तर अटक केलेल्या अरुण परेरा, वरवरा राव आणि वर्नन गोन्साल्विस या तिघांना पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. किशोर वढणे यांच्यासमोर या तिघांना हजर करण्यात आले. सरकारी वकील म्हणून उज्ज्वला पवार आणि आरोपींचे वकील रोहन नहार हे काम पाहत आहेत.

आरोपींकडून पत्रे मिळाली असून सर्व आरोपींनी एक संघटना स्थापन केली होती. या संघटनेकडून काढण्यात आलेली पत्रके आणि ठराव सरकारी वकिलांनी न्यायालयात वाचून दाखवले. गडचिरोलीतील साईबाबा प्रकरणाच्या निकालाने संघटनेचे नुकसान झाले असून त्याच्या बचावासाठी प्रयत्न सुरु असल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले. या संपूर्ण प्रकरणात राजीव गांधी हत्या प्रकरणासारखी कारवाई करावी लागेल, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.

आरोपींनी कशा प्रकारची हत्यारे खरेदी करायची याचा कॅटलॉग तयार केला होता आणि यासाठी नेपाळ व मणिपूरमधील माओवाद्यांशी बोलणी व्हायची, असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. शौर्य दिनाच्या नावाखाली जमावाला एकत्र आणले जात असून संघटनेच्या वतीने देशविघातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता. या प्रकरणातील आरोपींची चौकशी करायची असल्याने त्यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

कोरेगाव – भीमा येथे दोन गटातील वादामुळे हिंसाचार झाला. या घटनेत दंगल घडवण्याचा हेतू कुठेही नव्हता. पुणे पोलिसांना चौकशीत सहकार्य केल्याचे अरुण परेरा यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.