अकरा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या वसंतदादा पाटील सहकारी कारखान्यातील कामगारांनी मंगळवारी कार्यकारी संचालकांना घेराव घालून जाब विचारला. कामगारांच्या वेतनाविषयी बुधवारी दुपारी दोन वाजता चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष जे. डी. पवार यांनी दिले. या आश्वासनानंतर कामगारांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
वसाकाच्या कामगारांना गेल्या ११ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. तसेच तीन वर्षांपासून बोनस, भविष्य निर्वाह निधी, हंगामी कामगारांचे वेतन, महागाई भत्ताही मिळालेला नाही. या प्रश्नावर व्यवस्थापनाशी दोन वेळा चर्चा होऊनही कामगारांना वेतन मिळाले नाही. सलग ११ महिन्यांपासून निष्ठेने काम करीत असूनही त्यांच्या वेतनाबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याची कामगारांची भावना होती. त्यातच, कार्यकारी संचालक टी. ए. भोसले हे कारखाना कार्यस्थळावरून सामान गुंडाळून पोबारा करणार असल्याची कुणकुण लागताच संतप्त कामगारांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या दालनात प्रवेश करून घेराव घातला. वेतनाबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कायम व हंगामी कामगारांच्या वेतनाची रक्कम एक कोटी ७१ लाख, तीन वर्षांचा बोनस एक कोटी ३६ लाख, हंगामी कर्मचाऱ्यांचे एक कोटी ३६ लाख रुपये याप्रमाणे चार कोटी ८६ लाख रुपये त्वरित अदा करावेत, असा पवित्रा कामगारांनी स्वीकारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यानच्या काळात भोसले यांनी भ्रमणध्वनीवर अध्यक्षांशी संपर्क साधून आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर बुधवारी दुपारी चर्चा करून याविषयी निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.