ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर पलटवार केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत निर्माण झालेल्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणावर भाजपाचं प्रेम आहे पण ते प्रेम पुतना माविशीचं प्रेम आहे. त्यामुळे देशातील आरक्षण संपवायचं हाच भाजपाचा अजेंडा असल्याचं त्यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणाच्या विषयावर भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर तीव्र शब्दात टीका केली आहे.  महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाविरोधात कॉंग्रेसनीच पहिली याचिका केल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला नाना पटोले यांनी लगेचच उत्तर दिलं आहे. ओबीसी आरक्षणाला राजकीय ग्रहण हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच लागलं आहे. आणि हा आरोप नाहीतर वस्तूस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की भाजपा आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या अपयशाचं खापर महाविकास आघाडीवर फोडत आहेत. त्यांनी आम्हाला विचारलं की दोन वर्ष आम्ही काय केलं? तर माझा त्यांना हाच सवाल आहे की ५ वर्षे राज्यात सत्ता असताना भाजपाने काय केलं. ओबीसी आरक्षणाबाबतीतील केंद्रसरकारकडील डेटा चुकीचा असेल तर या माहितीचा वापर केंद्र सरकार का करत आहे असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. उलट इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारच देत नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना नाना पटोलो म्हणाले की देशातील सर्व प्रकारचे आरक्षण संपवण्याचा आरएसएस आणि भाजपाचा खूप जुना अजेंडा आहे. ओबीसी आरक्षणाच्याबाबतीत आज जी अडचण निर्माण झाली आहे याची सुरवात देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 दरम्यान रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावर आज नाना पटोले यांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. राजकीय द्वेषापायी फोन टॅपिंग करण्यात आलं होतं असं नाना यांनी संगीतलं.