विवाह समारंभात बहिणीची छेडछाड केल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत मूकबधिर युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील निरपण येथे घडली. याविषयी घोटी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरपण येथे शनिवारी अमृता भले यांच्या मुलीचे लग्न होते. रात्री साडेनऊच्या सुमारास संतोष भले हा मूकबधिर युवक हातवारे करून जेवण झाले का, अशी विचारणा करीत असताना भावडय़ा श्रावण वीर यास हा युवक आपल्या बहिणीची हातवारे करून छेडछाड करीत असल्याचा संशय आला. या संशयाने त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी संतोषला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्याच्या गुप्तांगाला मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला. वसंत भले यांच्या फिर्यादीवरून भावडय़ा वीर आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही फरार आहेत.