रायगड जिल्ह्य़ातील लेडीज बारमधील अनैतिक धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या रायगडच्या उत्पादन शुल्क अधीक्षका संगीता दरेकर यांची जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांनी कानउघाडणी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारामुळे जिल्ह्य़ाची बदनामी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्तांकडे याबाबत लेखी अहवाल पाठवणार असल्याचे जावळे यांनी स्पष्ट केले आहे.  रायगड जिल्ह्य़ातील खारघर, पनवेल आणि खालापूर परिसरात लेडीज बारच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरू आहेत. रायगडचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी याबाबतचे लेखी पत्र त्यांनी उत्पादन शुल्क अधीक्षकांकडे सहा महिन्यांपूर्वी पाठवले होते. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. पनवेलमधील बारमध्येही सुरू असलेल्या अनैतिक उद्योगांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या लेडीज बारमध्ये महिलांना नोकर परवाने देण्याचे काम उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडूनच केले जाते. हे परवाने रद्द करा, अशा लेखी सूचना देऊनही जर उत्पादन शुल्क अधिकारी करीत नसतील तर ही बाब गंभीर आहे. लेडीज बारवर कारवाई का झाली नाही आणि परवाने का दिले नाहीत याचे उत्तर उत्पादन शुल्क विभागाला द्यावे लागेल. या संपूर्ण प्रकरणाचा लेखी अहवाल राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्तांना आणि सचिवांना देणार असल्याचे जावळे यांनी सांगितले आहे.