सुमारे दोन वर्षांपासून खंडणीप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगायची असतानाही सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले भुसावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या विरोधात पालिका मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर चौधरी यांची रुग्णालयातून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. चौधरी व त्यांच्या समर्थकांच्या दांडगाईला चाप लावण्याचा हा प्रकार असल्याचे मानले जात आहे. भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी पालिकेच्या कारभारात चौधरी यांचा हस्तक्षेप, कर्मचाऱ्यांवरील दहशत व धमकावणे तसेच चौधरी समर्थकांमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौधरी यांच्या भेटीस घेऊन जाणे या प्रकारांविरोधात जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडे तक्रार केली होती.