उपराजधानीत तीन महिन्यांतील बलात्कारांचे ४४ गुन्हे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ दुप्पट झाल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना नसल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा फोल ठरला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानीत तीन महिन्यातील बलात्कार आणि लुटमारीच्या गुन्ह्य़ातील वाढ संतापाबरोबरच भीती निर्माण करणारी आहे. मुख्यमंत्र्यांच्याच शहरात सर्व प्रकारचे गुन्हे मोठय़ा प्रमाणात घडत असल्याने इतर शहरांचे काय? असा प्रश्न आपोपच यानिमित्त चर्चेस येतो. यासंदर्भात ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित करून नागपूरच्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नागपूर शहरात यावर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालखंडात ३० जणांची हत्या झाली. ४६ दरोडे आणि लुटमारीच्या घटना घडल्या तर ५० ते ६० महिलांवर बलात्कार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हणूनच नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांच्या लेखी प्रश्नातून स्पष्ट होतात. यावरील लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी गुन्ह्य़ांच्या आकडेवारीतील सुधारणा दर्शवली असली तरी नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरतो आहे.