बाजारांमध्ये बनावट औषधांचा सुळसुळाट
भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदिक उपचार पद्धतीला महत्त्व असले तरी या औषधांच्या गुणवत्तेकडे सरकारने फारसे लक्ष दिले नाही. एका अभ्यासात बाजारातील १० हजार आयुर्वेदिकऔषधांपैकी केवळ ५ टक्केच औषधांची गुणवत्ता मानके निश्चित करण्यात आली असून उर्वरित ९५ टक्क्यांची मानकेच निश्चित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे बाजारांमध्ये बनावट आयुर्वेदिक औषधांचा सुळसुळाट असून ती प्राशन केल्यास सामान्य रुग्णांच्या आरोग्याला धोकाही संभावतो. हा प्रकार टाळण्याकरिता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार गरजेचा आहे.
जगातील विकसनशील व इतर अनेक देशांत कोणतीही आयुर्वेदिक औषधे गुणवत्ता तपासल्याशिवाय रुग्णांना दिली जात नसून त्याची विक्रीही प्रतिबंधित आहे. परंतु भारतात अद्यापही या गंभीर बाबीकडे सरकारसह सामाजिक संस्थांचेही लक्ष नाही. त्यामुळे बाजारात अस्तित्वात असलेल्या औषधांच्या तुलनेत केवळ ५ टक्के औषधांचीच मानके अद्याप निर्धारित करण्यात आली आहेत.
या औषधांची निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा औषधींची ओळख व गुणवत्ता निर्धारण करणे, निर्मित औषधांचे मानकीकरण करणे काळाची गरज आहे. त्याकरिता गुणवत्ता मानके पद्धतीचा अवलंब करून देशात निर्माण केलेली औषधे वैज्ञानिकतेच्या कसोटीवर खरी उतरून रुग्णांना अद्ययावत व दर्जेदार औषधे मिळणे शक्य होईल. आयुर्वेदिक औषधे ही वनस्पती, खनिज व प्राणिज औषधी द्रव्यांचे मिश्रणे असतात. रुग्णांना या औषधी घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचे इतर वाईट परिणाम होऊ नये यासाठी त्यांची सुरक्षा व विश्वासार्हता जपणे आवश्यक आहे. हा विषय महत्त्वाचा असतांनाही अद्याप देशात फार कमी प्रमाणात म्हणजे ५०० च्या जवळपास औषधांचीच गुणवत्ता मानके निर्धारित झाली आहेत. ही संख्या कमी असल्याने देशात सुमारे साडेनऊ हजारांच्या जवळपास आयुर्वेद औषधे मानांकन न करताच विकली जात आहेत.
राष्ट्रीय परिषद रविवारपासून
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या रसशास्त्र विभागाकडून १९ आणि २० मार्चला ‘आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण, गरज व आव्हाने’ या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या परिषदेचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते १९ मार्चला दुपारी १२ वाजता होईल. त्याला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, आयुषचे संचालक कुलदीप कोहली यांच्यासह देशभरातील ४०० तज्ज्ञ उपस्थित राहतील. याप्रसंगी आयुर्वेदच्या विविध विषयांवर औषधे उत्पादक, डॉक्टर, विद्यार्थी, संशोधकांचे चर्चासत्र होईल, अशी माहिती शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता वैद्य गणेश मुक्कावार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावळी वैद्य राजकुमार खियानी, वैद्य प्रज्ञा स्वान, वैद्य गणेश टेकाळे, वैद्य मनीष भोयर, वैद्य गोविंद असाटी, वैद्य लुईस जॉन उपस्थित होते.
आयुर्वेदिक औषधांच्या गुणवत्ता मानकांकडे पूर्वी फारसे लक्ष न दिल्याने सुमारे दहा हजारांपैकी ५०० औषधांची गुणवत्ता मानकेच निर्धारित करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाकडून आता या गंभीर बाबीकडे लक्ष दिले गेले असून गुणवत्ता मानकांची प्रयोगशाळा वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहे. निश्चित त्याचा लाभ देशात दर्जेदार औषधे मिळण्याकरिता होईल.
– वैद्य गणेश मुक्कावार, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.