मनमोहनसिंग सरकारने चुकीची आर्थिक धोरणे राबविल्याने देशाचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी भोकरदन येथे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेत केला.
चुकीची आर्थिक धोरणे, दृष्टीहीन नेतृत्व व निर्णयक्षमता नसणारे केंद्रातील भ्रष्टाचारी सरकार जनतेच्या हिताचे नाही. यूपीए दोनच्या काळात देशात सर्वाधिक महागाई वाढली. आकाश, पृथ्वी व जमिनीच्या खाली हे सरकार संवेदनाहीन असून या काळात देशाची दुर्दशा झाली, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, जालना येथील मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी, केंद्रातील काँग्रेस सरकारने स्वत:च्या स्वार्थासाठी योजना राबविल्याचा आरोप केला. अन्न सुरक्षा विधेयक चुकीच्या पद्धतीने आणण्यात आले. गोरगरिबांना लाभ देण्याऐवजी केंद्राने अन्नधान्य कुजविण्याचेच काम केले. त्यामुळे ब्रेव्हरीजचाच फायदा होणार आहे. अरविंद केजरीवाल साधेपणाने राहत नाहीत, तर साधेपणाने राहण्याचे मार्केटिंग करतात. जो खरेच साधेपणाने राहतो, त्याला तसे सांगत फिरण्याची गरज नसते. वीज परिस्थिती व दराची तुलना करून गोवा महाराष्ट्रापेक्षा चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री अर्जुनराव खोतकार, भास्कर अंबेकर आदींची भाषणे झाली.