येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात २२ एप्रिलपर्यंत नोंद असलेल्या शेतकऱ्यांची तूर २४ तासांच्या आत मोजून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्यानंतर नाफेडच्या तूर खरेदीला वेग आला. परंतु गैरहजर शेतकऱ्यांच्या नावावर इतरांची नावे घालून तूर खरेदीचे प्रकार आढळून आल्याने शेतकरी चांगलेच संतापले. अखेर जिल्हा उपनिबंधक एन. आर. निकम, पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार यांनी अशा प्रकाराची चौकशी करण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिल्याने परिस्थिती निवळली.

बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात २२ एप्रिलपर्यंत एकूण १२ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी टाकली होती. १९० शेतकऱ्यांच्या ६ हजार १०७ क्विंटलची पंचनाम्याद्वारे नोंद झाली होती. तर उर्वरित ६ हजार क्विंटल नोंद झाली नव्हती. विशेष म्हणजे वारंवार नाफेडची खरेदी बंद पडल्याने मार्केट यार्डात तूर टाकून अनेक शेतकरी गावाकडे परतले. टाकलेल्या तुरीच्या नोंदी घेताना मार्केट यार्डात जे शेतकरी गरहजर होते, त्या ठिकाणी टाकलेल्या एकूण तुरीची नोंद घेण्यात आली. परंतु यादीवर शेतकरी गरहजर असल्याची नोंद करण्यात आली.  शासनाने २२ एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करण्याचे आदेश दिले. तीन दिवसांच्या सुट्टय़ा रद्द करून वजनकाटा करून घेण्याच्या सूचना असताना तहसीलदाराच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी खरेदीची औपचारिकता पूर्ण केली. केवळ ३९ क्विंटल मालाची मोजणी करून पुढील खरेदी २ मे पर्यंत तीन दिवस थांबवली. मंगळवारी तूर खरेदीला प्रारंभ झाला. परंतु शेतकऱ्यांच्या नोंदी व तूर खरेदीसाठी लावण्यात आलेल्या निकषावरून वादाला तोंड फुटले. त्यातच बुधवारी हळद कमी भावाने खरेदी होत असल्याने मार्केट यार्डात व्यापारी व शेतकऱ्यांत वाद होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बाजार समितीच्या सचिवांनी पोलीस बंदोबस्त मागविला. पोलिसांनी वातावरण शांत केले.

मार्केट यार्डातील शेतकऱ्यांच्या माल खरेदीवरून सुरू असलेल्या गोंधळाची जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दखल घेऊन शुक्रवारी अचानक भेट दिली. २४ तासांच्या आत तुरीची खरेदी करून वजनकाटा झाला पाहिजे, अशा सूचना दिल्याने यंत्रणा चांगलीच कामाला लागली. परंतु शनिवारी परत तूर खरेदीसाठी लावण्यात आलेल्या मालाची गुणवत्ता ठरवण्याच्या कारणावरून तसेच शेतकऱ्यांच्या नोंदीवरून शेतकरी व नाफेडच्या कर्मचाऱ्यात वादाला तोंड फुटले. चांगला माल असताना तो खरेदी का केला जात नाही, तर गरहजर शेतकऱ्यांच्या नावावर इतरांची नावे घालून तूर खरेदी कशी केली जाते. असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केल्याने मार्केट यार्डात पुन्हा एकच गोंधळ उडाला, मात्र अधिकाऱ्यांनी समजूत घातली.