दुर्दम्य आशावाद आणि आंतरिक शक्तीच्या शिदोरीवर लातूरकर सलाउद्दीन मैनोद्दीन शेख या ३२वर्षीय तरुणाची गेली साडेदहा वर्षे जीवन जगण्याची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे सलाउद्दीनला आठवडय़ातून दोन वेळा, तेही मोफत डायलिसिस करून लातूरच्याच विवेकानंद रुग्णालयाने समाजापुढे कित्ता ठेवला आहे. आज (शुक्रवारी) एक हजारावे डायलिसिस सलाउद्दीनवर केले जाणार आहे.
लातूर जिल्हय़ाच्या शिरूर ताजबंद येथील मनोद्दीन शेख यांच्या कुटुंबातील हे उदाहरण. मनोद्दीन आता हयात नाहीत. बारा वर्षांपूर्वी छोटा मुलगा अल्लाउद्दीनची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. त्यामुळे बहिणीच्या मुलाने एक मूत्रपिंड मामास देऊ केले. मुंबईच्या केईएम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. मोठा मुलगा सलाउद्दीन याचे शिक्षणही जेमतेम. तो गवंडीकाम करतो. अकरा वर्षांपूर्वी (२००३) त्याला कावीळ झाली. सुरुवातीला घरगुती उपाय व नंतर रुग्णालयात दाखवले, तेव्हा काविळीचा परिणाम मूत्रपिंडावर झाल्याचे निदर्शनास आले. विवेकानंद रुग्णालयात ८ डिसेंबर २००३ रोजी डायलिसिस करावे लागले. सलाउद्दीनची स्थिती विचारात घेऊन डॉ. गोपीकिशन भराडिया यांनीही आर्थिक मदतीचा शब्द पाळला.
गेल्या साडेदहा वर्षांपासून सलाउद्दीनला ९९९ वेळा डायलिसिस करावे लागले. सुरुवातीला आठवडय़ातून एकदा व नंतर आठवडय़ातून दोन वेळा लातूरला यावे लागते. विवेकानंद रुग्णालयाने सलाउद्दीनला दिलेला शब्द पाळला. उपचारासाठी एक पसाही घेतला नाही. सर्व डायलिसिस मोफत करण्याचा निर्णय ‘विवेकानंद’ने घेतला आहे. गेल्या ८ वर्षांपासून सल्लाउद्दीनला एक थेंबही लघवी झाली नाही. अशा स्थितीत एक दिवसाआड डायलिसिस करावेच लागते. मात्र, सलाउद्दीनच्या शरीराने आठवडय़ातून दोन वेळा डायलिसिसची सवय लावून घेतली आहे. मंगळवार व शुक्रवार हे दोन दिवस विवेकानंद रुग्णालयात तो येतो. सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार व रविवार यापकी किमान ४ दिवस गवंडीकाम करतो. सध्या डायलिसिसची अद्ययावत उपचार पध्दती उपलब्ध आहे. ती थोडी महाग असली, तरी या उपचारामुळे २५ वर्षांंपेक्षादेखील अधिक काळ जगता येऊ शकते. ‘विवेकानंद’प्रमाणे समाजातील इतरही दात्यांनी सलाउद्दीनसारख्यांना मदतीचे सढळ हात पुढे करण्याची गरज आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
गरीब तरुणाचा जीवनसंघर्ष
दुर्दम्य आशावाद आणि आंतरिक शक्तीच्या शिदोरीवर लातूरकर सलाउद्दीन मैनोद्दीन शेख या ३२वर्षीय तरुणाची गेली साडेदहा वर्षे जीवन जगण्याची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे सलाउद्दीनला आठवडय़ातून दोन वेळा, तेही मोफत डायलिसिस करून लातूरच्याच विवेकानंद रुग्णालयाने समाजापुढे कित्ता ठेवला आहे.
First published on: 27-06-2014 at 01:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight of poor youngster