दिगंबर शिंदे

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केल्याने पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यभरात खळबळ माजणे स्वाभाविकच आहे. याच पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपवर विखारी टीका केली होती. आक्रमकपणे टीकाटिप्पणी करून लक्ष वेधून घेण्याचा पडळकरांचा प्रयत्न आहे.

पश्चिम महाराष्ट्र तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या साखर कारखानदारी पोसल्या गेलेल्या जिल्ह्य़ातील नवे आमदार पडळकरांनी राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले. यामुळे त्यांचा लक्ष वेधून घेण्याचा इरादा काही प्रमाणात यशस्वी झाला असेच मानावे लागेल. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही या टीकेला फारसे महत्त्व देण्याची गरज वाटली नसली तरी यामागचा बोलविता धनी कोण हा प्रश्न चर्चिला जात आहे.

पडळकर यांचे वक्तृत्व बहरले ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभांमधूनच. तत्पूर्वी त्यांचा एक नंबरचा शत्रू हा राष्ट्रवादी काँग्रेसच राहिला आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्याला खोटय़ा गुन्ह्य़ात अडकवल्याचा आरोप करीत पडळकरांनी तरुणांची फळी आपल्याकडे खेचली होती. सांगली जिल्ह्य़ाच्या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीसारख्या छोटय़ा गावातील हा तरुण धनगर आरक्षणासाठी मैदानात उतरला. आरक्षणाच्या प्रश्नावरून समाजात वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतानाच भाजपची मोकळी नौका हाताशी लागली. मोदी लाटेनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली जवळीक त्यांना लाभदायी ठरली.

मात्र त्यांनी आजपर्यंत कधीही एक विचार न मानता वेळोवेळी वेगळ्या राजकीय पक्षांमध्ये जात आपले स्थान तयार करण्याचा प्रयत्न केला. भाजपमधून बाहेर पडत असताना सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीत काँग्रेसकडून मैदानात उतरण्याची कोणाची तयारी नाही हे लक्षात येताच त्यांनी स्वाभिमानीची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न यशस्वी होत नाही हे लक्षात येताच घाईगडबडीने नागपूरला जाऊन बहुजन वंचित विकास आघाडीची उमेदवारी घेऊन ऐनवेळी मैदानात उतरून तीन लाखांहून अधिक मते घेतली. यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्राचेच नव्हे तर राज्याचे लक्ष त्यांनी वेधून घेतले.

तत्पूर्वी, धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा बनात जंगी मेळावा घेऊन तरुणांमध्ये प्रसिद्ध झालेल्या हार्दिक पटेल यांना बोलावून मोदी सरकारला विशेषत: भाजपवर टीकेची झोड उठवली. जमलेल्या गर्दीकडून बिरोबाची आण घेतली आणि भाजपला मतदान करणार नाही, असे वदवून घेत समाजाचे भले केवळ आपणच करू शकतो, असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला.

भाजपनेही पडळकर यांना बारामतीच्या उमेदवारीची बक्षिसी दिली. या मतदार संघामध्ये भाजपला विजय मिळण्याची सुतराम शक्यता नसताना पडळकर यांनी ही उमेदवारी का स्वीकारली याचे उत्तर गेल्या महिन्यात विधान परिषदेतील निवडीवरून स्पष्ट झाले.

विधान परिषदेसाठी पक्षाने ज्येष्ठ नेत्यांना डावलून पडळकर यांना संधी दिली. शब्दांचा हत्यारासारखा वापर करणारा  नेता पक्षाला हवा होता. गरज होती म्हणून पडळकरांना संधी दिली गेली की काय अशी रास्त शंका व्यक्त होत होती. अगदी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांबद्दल अवाक्षरही सहन न करणारे भाजपनेते बिरोबा बनातील त्यांच्या भाषणाची ध्वनिफीत ऐकून न ऐकल्यासारखे करीत असतील तर प्रश्नच नाही.

पाच दशकांहून अधिक काळ राजकारण आणि समाजकारण करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांची टीका म्हणजे काजव्याने सूर्याला अधिक प्रकाशमान कोण आहे हे विचारण्यातला प्रकार. ज्यांनी आरेवाडीमध्ये बिरोबाची शपथ घेऊन समाजाची फसवणूक केली अशा व्यक्तीकडून विकासाची अपेक्षाच धरणे मुळात चुकीचे. यामागे आपण किती भाजपनिष्ठ आहोत हे दाखविण्याचाच हा प्रयत्न असावा.

– कमलाकर पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राध्यक्ष, सांगली.

लोकशाहीत मत-मतांतरे असणे स्वाभाविकच आहे, मात्र मत व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द आणि योग्य व्यासपीठाचा वापर करता येणे आवश्यक असते. राजकीय जीवनात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी आपली मते मांडत असताना तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. मात्र टीका करताना ती वैयक्तिक पातळीवर न करता विधायक मार्गाचा अवलंब केला तर ते समाजाच्या भल्यासाठी आवश्यकच आहे.

-मकरंद देशपांडे, प्रदेश सचिव, भाजप.