विदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागावेत या उद्देशाने उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून गेल्या पाच दिवसांत ६० तास काम होणे अपेक्षित असताना विधिमंडळाचे १९ तास काम झाले. त्यातही गोंधळामुळे कामकाज सहा वेळा तहकूब करण्यात आल्यामुळे प्रत्यक्षात ११ तास काम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत शोकप्रस्ताव मांडण्यात आला, त्यापूर्वी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे पहिला तास वाया गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह २४ थोर पुरुषांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज जवळपास चार तासच चालले.