नांदेड: जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली. यातील तीन व्यक्तींचा मृत्यू लोहा तालुक्यातील मौजे धावरी येथे वीज पडून झाल्याचे सांगण्यात आले. नांदेड शहर व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यातच वीज पडून झालेल्या दुर्घटनांमध्ये एकंदर चार जणांचा मृत्यू झाला. लोहा तालुक्यात मौजे धावरी येथे मंगळवारी दुपारी वीज पडल्यामुळे माधव पिराजी डुबुकवाड (रा.पानभोसी ता.कंधार), पोचीराम श्यामराव गायकवाड (रा.पेठपिंलगाव) व रूपाली पोचीराम गायकवाड या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत पूजा माधव डुबुकवाड ही युवती जखमी झाली.

हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा शिवारातही वीज कोसळून एक शेतकरी जागीच मरण पावला तर या दुर्घटनेत अन्य एक जण जखमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या माहितीनुसार देगलूर तालुक्यातील मौजे सुंडगी (बु.) येथील शेतकरी मल्लू विठ्ठल बरसमवार हा लेंडी नदीत वाहून मरण पावल्याची बाब मंगळवारी निदर्शनास आली. भोकर तालुक्यातील सोमठाणा येथे वीज पडून एक म्हैस दगावली. नांदेड शहरात सोमवारी पावसाने दिवसभर विश्रांती घेतली. मंगळवारी दिवसभर वातावरण स्वच्छ होते; पण सायंकाळनंतर पावसाला सुरूवात झाली.