मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस वे) भरधाव वेगाने येणाऱ्या स्वीफ्ट गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे ती पलिकडच्या रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर धडकल्याने झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले, तर दोघे जबर जखमी झाले. कामशेत जवळील पवना चौकी येथे सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला.मृतांत तिघे मुंबईचे, तर दोन पुण्याचे आहेत.
गेल्या महिन्याभरात अशा प्रकारे घडलेला एक्स्प्रेस वेवरील हा तिसरा अपघात आहे.  गेल्या महिन्यात २३ तारखेला अशाप्रकारच्या अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवडय़ाने अ‍ॅटलस कॉप्को कंपनीचे वरिष्ठ अधिकारी गोपाल यांचा असाच मृत्यू झाला होता. वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे स्वीफ्ट मोटारीतून तिघेजण निघाले होते. कामशेत जवळील पवना चौकी येथे या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती विरुद्ध दिशेला गेली. त्यावेळी मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या इको मारुती मोटारीवर जाऊन ही स्वीफ्ट आदळली. या अपघातात अजित आनंद लालवाणी (वय ४८, रा. मुलुंड, मुंबई) प्रकाश गुणाजी साळवे (वय ४५, रा. शिवडी, मुंबई), शिवाजी तुकाराम वायकर (वय ४७, रा. भांडुप, मुंबई), गजानन शंकर पंडित (वय ४१, रा. वाकड, पुणे) आणि यज्ञेश्वर गजानन पाठक (वय ५०, रा. वडगाव ब्रु., पुणे) अशी मृतांची नावे आहेत. तर स्वानंद मधुसुदन अत्रे (वय २९, रा. मुंबई) आणि किसन भिकाजी इंगुळकर (वय ५०, रा. आडोली, वेल्हा) हे जखमी आहेत. लालवणी हे उद्योगपती असून त्यांचा मुलुंड येथे व्यवसाय आहे.
दुभाजकाची उंची कधी वाढवणार?
रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला मोटार जात होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. नुकत्याच झालेल्या रस्ता सुरक्षा पंधरवडय़ात राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दुभाजकांची उंची अडीच फुटांपर्यंत वाढविण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत विचारले असता पुणे महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ म्हणाले की, रस्ता दुभाजकाची उंची वाढवावी हा आम्ही प्रस्ताव दिला आहे. मात्र, याची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्याची गरज आहे. घाट संपल्यानंतर रस्ता सरळ आहे. त्यामुळे वाहनांची गती वाढते. त्याच बरोबर इतर ठिकाणीही वाहनांना गती जास्त असते. ही गती मोजण्याची साधने आमच्याकडे नाहीत. ती सुद्धा लवकरात लवकर मिळावीत.