दागिन्यांच्या दुकानात गुरुवारी दुपारी मालकास मारहाण करत सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने चोरण्यात आल्याचा प्रकार येथे घडला. पाच लाख ७२ हजारांचे सोने चोरून नेऊन पोबारा केला. या घटनेने लासलगावी मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायतीच्या गाळा क्र. ११ मध्ये सावळीराम विसपुते यांचे सप्तशृंगी ज्वेलर्स हे दुकान आहे. भरवस्तीत असलेल्या या दुकानात दुपारी साडेअकराच्या सुमारास २५ ते ३० या वयोगटातील दोन जण दुकानात आले. त्यांनी हिंदी भाषेतून महिलेसाठी गळ्यातील चांदीचा ताईत दाखविण्याची विनंती केली. ताईतमध्ये टाकण्यासाठी सोने व चांदीची मागणी केली. विसपुते हे ताईत काढू लागले असता दोघा भामटय़ांपैकी एकाने दुकानातील दागिन्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला. विसपुते यांनी त्यास हटकले असता दुसऱ्याने विसपुते यांना मारहाण करत पळ काढला. विसपुते यांनी आरडाओरड केली. परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरटय़ांनी सुमारे पाच लाख ७२ हजार ५०० रुपयांचे सोने चोरून नेल्याचा अंदाज विसपुते यांनी व्यक्त केला आहे.
लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.