संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला ‘नॅक’कडून अ श्रेणी मिळावी आणि जाता-जाता का होईना आपण एक सर्वोत्तम काम करून गेलो, याचे समाधानही मिळावे, यासाठी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी ‘नॅक’ ची समिती विद्यापीठात येण्यापूर्वी अभिरूप ‘नॅक’ समिती गठीत करून एक रंगीत तालीम घेतल्याचा नवा प्रयोग केला आहे. कोणत्याही विद्यापीठाला न सुचलेली ही कल्पना आता राज्यातील ११ विद्यापीठे आणि ३ हजारावर महाविद्यालये अमलात आणून आपल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयाला अ श्रेणी मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.
कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांचा कार्यकाल अडीच महिन्यांनी अर्थात २३ फेब्रुवारी २०१६ रोजी संपत आहे. गेल्या ५ वर्षांच्या कालावधीपकी सुमारे ६ महिन्यांचा कालावधी राज्यपाल व कुलपतींच्या आदेशाने सक्तीच्या रजेवर जाण्यात गेला आहे. कुलगुरूंनी घेतलेल्या बांधाबांध भत्याच्या ७५ हजार रुपयांचे प्रकरण, आपल्या मुलीच्या परीक्षेतील गुणवाढीचे प्रकरण विद्यापीठात आणि प्रसार माध्यमात राज्यभर गाजले होते. त्या सर्व प्रकरणावर कालौघात पडदा पडला. अलिकडे एमपीएड अभ्यासक्रम तयार करण्याच्या संदर्भातील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सुरू असलेली टोळाटाळ, त्यात गृह राज्यमंत्र्यांचा अनावश्यक हस्तक्षेप, कोणत्याही प्राधिकरणावर नसलेल्या व्यक्तींचा अनाकलनीय सहभाग, असे प्रकरण सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठात नॅकची चमू २१ डिसेंबरला येत आहे. विद्यापीठाला गेल्या खेपेला अर्थात, तत्कालीन कुलगुरू डॉ. कमलसिंग यांच्या काळात नॅकची श्रेणी ब मिळाली होती. आपल्या काळात विद्यापीठाचा दर्जा उंचावला असून प्रगतीचा आलेख चढतीवर आहे, अ श्रेणी मिळाल्यास सिध्द् होईल. त्या दृष्टीने विद्यापीठाचे सर्व विभाग ‘जी जान से’ कामाला भिडले आहेत.
नॅक चमू येण्यापूर्वी कुलगुरू डॉ. खेडकर आणि नवनियुक्त कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी ‘मॉक-नॅक’ अर्थात, अभिरूप नॅकचा प्रयोग यशस्वीपणे पार पाडला. या अभिरूप नॅकमध्ये राज्यातील काही विद्यापीठांचे माजी कुलगुरू, तसेच ज्यांना नॅक समिती सदस्यपदाचा अनुभव आहे, अशा तज्ज्ञांचा समावेश होता. त्यांनी आपल्या पाहणीत आढळलेल्या त्रुटी, चुका, कमतरता आदींचा उल्लेख विद्यापीठाला सादर केलेल्या अहवालात केला आहे. तो लक्षात घेऊन विद्यापीठाने स्वतला अद्ययावत बनवण्याचा प्रयत्न जोमाने चालवला आहे. जेणेकरून विद्यापीठाला ‘नॅक’ची अ श्रेणी मिळेल, अशी विद्यापीठाला आशा आहे. तसे झाल्यास जाता-जाता का होईना कुलगुरूंनी एक चांगले काम केल्याचे प्रशस्तीपत्रक त्यांच्या पदरात पडणार आहे. मावळतीच्या सूर्याला कोणी अघ्र्य देत नाही, पण अ श्रेणी प्राप्त झाल्यास कुलगुरूंना नक्कीच समाधान मिळेल, अशी विद्यापीठ वर्तृळात चर्चा आहे.

सक्तीच्या रजेची
नुकसान भरपाई?
सहा महिन्यांच्या सक्तीच्या रजेचा कार्यकालाची नुकसान भरपाई कुलगुरूंना कशी करून देता येईल, या संबंधीही विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. कुलगुरू डॉ. मोहन खेडकर याचा कार्यकाल २३ फेब्रुवारीला संपत आहे. नसíगक न्यायाच्या तत्वासाठी तो सहा महिन्यांनी वाढवून मिळावा, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू असल्याचेही समजते.