चार ते पाच महिन्यांमध्ये चार तक्रारी

अमरावती : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर मेळघाटातील महिला वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या छळाच्या चार तक्रारी  उघड झाल्या आहेत. याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर एका प्रकरणात लिपिकाला निलंबित करण्यात आले असून एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव वनविभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

पंधरा दिवसांपूर्वी चौराकुंड परिक्षेत्रात कार्य करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी मध्यरात्री पोहचून वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकाने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याची ही तक्रार आहे. या कर्मचाऱ्याच्या निवासस्थानी दारावर लाथा मारण्यात आल्या आणि शिवीगाळ देखील करण्यात आली.

या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर कनिष्ठ लिपिक नीलेश सुरजुसे याला निलंबित करण्यात आले. संतोष खुरसाम हा वनपरिक्षेत्र अधिकारी घटनेपासून बेपत्ता आहे. त्याच्यावरील कारवाईचा प्रस्ताव सिपना वन्यजीव विभागातर्फे  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. तक्रारीनंतर परीविक्षाधीन आयएफएस अधिकारी मधुमिता एस. यांच्या समितीने के लेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात येऊन त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष खुरसाम हा दीड वर्षांपासून बेपत्ता असून १५ जुलैला चौराकुंड येथे परत येऊन त्याने गोंधळ घातला आणि तो पुन्हा बेपत्ता झाल्याची माहिती आहे. अशाच प्रकारच्या चार तक्रारी महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयाकडे के ल्या आहेत. त्याची चौकशी सुरू आहे.