सोलापूरचे माजी खासदार तथा भाजपचे नेते लिंगराज बालईरय्या वल्याळ यांचे सोमवारी सकाळी १.४० वाजता येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार घेत असताना ह्दयविकाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. गेली दहा वर्षे ते पक्षाघाताने आजारी होते. त्यातच ह्दयविकाराचा त्रास बळावल्याने अखेर त्यांचे निधन झाले. सायंकाळी उशिरा अक्कलकोट रस्त्यावरील पद्मशाली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वल्याळ यांच्यावर पक्षाघाताच्या आजारामुळे बंगळुरू येथील खासगी रुग्णालयात नियमित तपासणी तथा उपचार चालू होते. गेल्या आठवडय़ात त्यांना तपासणीसाठी बंगळुरू येथे नेण्यात आले असता त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू झाले असता कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊनही उपचारात फारशी प्रगती झाली नाही. त्यामुळे अखेर त्यांना सोलापुरात परत आणून अश्विनी रुग्णाालयात दाखल करण्यात आले होते.