औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे म्हणून शिवसेनेला हा मुद्दा आठवतो आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळेच शिवसेनेने पुन्हा एकदा नामांतराचा विषय समोर आणला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरणाला विरोध केला काय किंवा नाही केला काय? शिवसेनेला हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता हवा असतो. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी २०२१ हे वर्ष सगळ्यांना आनंदाचं आणि सुखासमाधानाचं जावो असंही म्हटलं आहे. तसंच यंदाच्या वर्षी तरी राज्य सरकार शेतकरी आणि मजुरांना मदत करेल अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा- “काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?”

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?

औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला कॉंग्रेसचा विरोध असेल. किमान समान कार्यक्रमामध्ये नामांतरासारख्या बाबीचा समावेश नाही. अशा नामांतरामुळे सामान्यांचा विकास होतो असे आम्ही मानत नाही. केवळ नामांतरच नाही तर घटनेतील प्रास्ताविकेमध्ये दिलेल्या मूल्यांची प्रतारणा होईल अशा कोणत्याही कृतीस कॉंग्रेसचा विरोध असेल असे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीमध्ये सांगितले.

आणखी वाचा- “आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी?”

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वारंवार केली आहे. एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं त्यामुळे ते पूर्ण करणारच असंही शिवसेनेने म्हटलं आहे. अशात आता काँग्रेसने नामांतराला विरोध दर्शवला आहे त्यासाठी शिवसेनेला थेट किमान समान कार्यक्रमाची आठवणच बाळासाहेब थोरात यांनी करुन दिली आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली आहे का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या दोन्ही पक्षांमध्ये नामांतराच्या मुद्द्यावरुन नुरा कुस्ती सुरु असल्याचं म्हटलं आहे.