प्रसिद्ध म्युरल्स डिझायनर भारत रावल यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत प्रथमच त्रिमितीय शिल्प (म्युरल्स) निर्मितीच्या मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले आहे. या शिबिरात ‘थ्रीडी सिरॅमिक, थ्रीडी ग्लास, थ्रीडी मल्टिलेयर, थ्रीडी मिक्स मीडिया फर्निचर’ अशा वेगवेगळ्या म्युरल्सच्या प्रकारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
याबाबतची माहिती शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत नंदिनी अहिरराव यांनी दिली. कॉलेजरोडवरील अहिरराव कॉर्नरवरील कमल येथे सकाळी दहा ते सायंकाळी सात या कालावधीत हे दहादिवसीय शिबीर होईल. या शिबिरासाठी शिक्षणाची अट नसून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकते. विशेष म्हणजे, चित्रकलेची पाश्र्वभूमी नसलेल्या व्यक्तींनाही या निर्मितीचा सहजपणे आनंद घेता येतो. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवक व युवतींना घरबसल्या रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकते. घर व कार्यालय सजविण्याच्या कामात वास्तुविशारद म्युरल्सचा प्रामुख्याने उपयोग करतात. स्थानिक पातळीवर त्यांना मुरल्सनिर्मिती करणारे पर्याय अतिशय त्रोटक स्वरूपात उपलब्ध असतात. म्हणजे, या माध्यमातून स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध असल्याचे रावल व अहिरराव यांनी नमूद केले. थ्रीडी म्युरल्स या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी रावल हे गेल्या ३५ वर्षांपासून म्युरल डिझायनिंग या विषयावर संशोधन करीत आहे. त्यांनी आतापर्यंत देशात ७५हून अधिक प्रशिक्षण शिबिरे घेतली असून या माध्यमातून तब्बल आठ ते नऊ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. नाशिक येथे प्रथमच हे शिबीर होत असून त्याचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या संदर्भात नावनोंदणीसाठी ९२२५७२२२२७, ९८६०७११११७ या क्रमांकांवर तसेच www.bharatrawal या संकेतस्थळावरही संपर्क साधता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free training of 3d sculpture creation in nasik
First published on: 10-02-2013 at 02:28 IST