राज्यातील स्थिती फार चांगली नाही, अशी जाहीर कबुली देतानाच लोकसभेनंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका होतील. राज्यात सत्ता टिकवायची असेल तर आघाडीचा धर्म पाळा. काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचाराला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
सातव यांच्या प्रचारानिमित्त सेनगाव येथे झालेल्या सभेनंतर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील या वेळी उपस्थित होते. सभा संपल्यानंतर आव्हाड यांनी माजी खासदार शिवाजी माने यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादी भवनात बैठक घेतली. जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, माजी खासदार माने, उपाध्यक्ष शेख निहाल, केशवराव नाईक, अनिल नैनवाणी आदी या वेळी उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित अनिल पतंगे म्हणाले की, आमदार भाऊ पाटील काँग्रेसचे आहेत. त्यांचे पक्ष कार्यकर्त्यांना सहकार्य मिळण्याऐवजी नाहक तारांकित प्रश्न लावून कार्यकर्त्यांच्या कामाची चौकशी करतात. या वेळी ही जागा काँग्रेसला सोडल्याने कार्यकर्त्यांची नाराजी आहे. या पुढे असा काही प्रकार घडणार नाही, यासाठी मी त्यांच्यासोबत चर्चा करतो, असे आव्हाड म्हणाले. आव्हाड यांनी माने यांना तुमची काय नाराजी आहे, असे विचारल्यावर माने म्हणाले की, कयाधु नदीवरील बंधाऱ्याच्या कामाचे आश्वासन सातव यांनी द्यावे, एवढीच मागणी होती. पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी आश्वासन दिले असते तर मी निवडणूक प्रचारकामाला लागलो असतो. त्यावर आव्हाड यांनी या विषयावर सातव यांच्याशी बोलतो. नंतर ते तुमच्यासोबत चर्चा करतील, असे सांगून माने यांचा रुसवा दूर करण्याचा प्रयत्न केला.