जालना लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर रुसलेल्या हरिभाऊ बागडे यांच्या नाराजीवरचा उतारा म्हणून मंगळवारी फुलंब्री, सिल्लोड तालुक्यातील २२ जणांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. माजी मंत्री नामदेवराव गाडेकर, बाजार समितीचे सभापती श्रीरंग पाटील साळवे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पुंडलिकराव मोरे आदींचा यात समावेश आहे.
फुलंब्री मतदारसंघात बागडे यांचे राजकीय वजन आहे. ते गेल्या काही दिवसांपासून दानवे यांच्या प्रचारात उतरले नव्हते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालय उद्घाटनासही बागडे यांनी दांडी मारली. त्यानंतर ते नाराज असल्याचे स्पष्ट झाले. पत्रकार बैठकीत दानवे यांना या बाबत विचारले असता ‘बागडे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते नाराज नाहीत. वर्तमानपत्रातील मजकुरावरून ते नाराज असल्याचे म्हणता येणार नाही. ते प्रचारात उतरतील,’ असे ते म्हणाले.
डॉ. नामदेवराव गाडेकर काँग्रेसमधून भाजपत आले. काँग्रेसने वारंवार अन्याय केल्यामुळे पक्षांतर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. फुलंब्री व सिल्लोड तालुक्यातील सहकार चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने या मतदारसंघातून दानवे यांना अधिक मते मिळतील, असा दावा या वेळी करण्यात आला. सदाशिवराव तायडे, शिवाजीराव पाथ्रीकर, जयप्रकाश बोराडे, शिवाजीराव गाडेकर, जनार्दन शेजवळ, संतोष शिंदे, अशोकराव साळुंके, रमेश साळुंके, ज्ञानदेव उकिरडे यांच्यासह २२ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बागडे प्रचारात नसले, तरी त्यांचे राजकीय वजन असणाऱ्या तालुक्यातून अन्य नेत्यांना भाजपत प्रवेश दिल्याने ही खेळी नाराजीवरचा उतारा मानले जात आहे.