खोपोली शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी केले आहे. खोपोली नगर पालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.     मुंबई-पुणे यांच्या मध्यावर वसलेले खोपोली शहर आहे. एक औद्योगिक शहर म्हणूनही या शहराची ओळख आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढणार आहे. त्यामुळे नगरपालिकेला सतत सजग राहावे लागणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. एमएमआरडीएच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी दर वर्षी मोठय़ा प्रमाणात निधी मिळवून देणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. खोपोली शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आणि भुयारी गटार योजनेसाठी यापुढे प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे तटकरे यांनी म्हटले.      खोपोली शहरातील १२ कोटी ३४ लाख रुपयांच्या विविध ३६ विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार सुरेश लाड, नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, मुख्याधिकारी धुपे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांनी केले, तर आमदार सुरेश लाड यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.