लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत सध्या जागावाटपावर चर्चा चालू आहे. अशातच महायुतीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून तिन्ही पक्षांमध्ये ३२-१२-४ असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. तसेच महायुतीत शिवसेनेच्या जागा कमी होतील, असं बोललं जात आहे. या कथित फॉर्म्युलावर आणि शिवसेनेच्या जागांबाबत शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कीर्तिकर म्हणाले, शिवसेना आणि भाजपाचा २२-२६ जागांचा फॉर्म्युला आहे. आता महायुतीत अजित पवारांचा गट असल्याने शिवसेनेला आणि भाजपाला आपल्या काही जागा अजित पवार यांच्या पक्षाला द्याव्या लागतील. परंतु, ते करत असताना तिन्ही पक्षांनी एकमेकांचा आदर करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गजानन कीर्तिकर म्हणाले, “मुंबईत तीन जागा शिवसेनेच्या आणि तीन जागा भाजपाच्या असं आधीपासूनच ठरलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात २२-२६ या फॉर्म्युलाचा आधार आहे. या आधारावरच पुढील रणनीति ठरवली पाहिजे, असं माझं मत आहे. त्यात फार मोठा बदल करून चालणार नाही.” गजानन कीर्तिकर यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जागावाटपाबाबत त्यांची मतं मांडली.

यावेळी कीर्तिकर यांना विचारण्यात आलं की, जुन्या फॉर्म्युलानुसार चर्चा झाली नाही किंवा शिवसेनेच्या जागा कमी झाल्यास शिंदे गटाचं पुढचं पाऊल काय असेल? त्यावर कीर्तिकर म्हणाले, असंच करावं लागणार आहे. युतीतल्या सर्व पक्षांनी एकमेकांचा आदर ठेवायला हवा. संपूर्ण महाराष्ट्रात आमची म्हणजेच शिवसेनेची मोठी व्होटबँक आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ती व्होटबँक तयार केली आहे. शिवसेनेकडे एक विचारधारा आहे. शिवसेनेचे स्वतःचे हिंदुत्ववादी विचार आहेत. शिवसेना राष्ट्रीय भावना जपते, अशी देशभर तिची ओळख आहे. शिवसेनेकडे आक्रमक शैली आहे. मराठी माणसांचा सर्वांगीण विकास करणे ही शिवसेनेची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. महाराष्ट्रात शिवसेनेकडे मोठी व्होटबँक असल्यामुळे शिवसेनेचा तसा आदर राखला गेला पाहिजे. युतीतल्या प्रत्येक पक्षाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे.

हे ही वाचा >> “बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत होणार?” संजय काकडेंचं वक्तव्य; मतांचं गणित मांडत सांगितलं कोण जिंकणार?

गजानन कीर्तिकर म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. या १८ जागांवर आम्ही ठाम आहोत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे १३ खासदार आले आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी संरक्षण दिलं पाहिजे. त्यांना राजकीय स्थैर्य द्यायला हवं. आमच्याबरोबर दगाफटका व्हायला नको.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajanan kirtikar warns bjp says shivsena shinde faction has vote bank in maharashtra asc
Show comments